प्रीतीचे मूर्तीमंत प्रतीक असलेले सनातनचे सद्गुरु नंदकुमार जाधव !

ज्येष्ठ शुक्ल पक्ष अष्टमी (१८.६.२०२१) या दिवशी सनातनचे सद्गुरु नंदकुमार जाधवकाका यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त जळगाव येथील ६८ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. दत्तात्रेय वाघुळदे आणि त्यांच्या पत्नी सौ. किरण वाघुळदे यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये अन् त्यांच्या संदर्भात आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

सद्गुरु नंदकुमार जाधव

सद्गुरु नंदकुमार जाधवकाका यांना वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने कृतज्ञतापूर्वक नमस्कार !

१. श्री. दत्तात्रेय वाघुळदे, जळगाव

श्री. दत्तात्रेय वाघुळदे

१ अ. प्रीती

सद्गुरु जाधवकाका आणि मी नगरहून जळगावला जाण्यासाठी बसने प्रवास करत होतो. त्याच बसमध्ये भोपाळ येथील शिरडोणकर दांपत्याची भेट झाली. ते नगर येथील मेहेरबाबांचा कार्यक्रम आटोपून परतीच्या प्रवासाला निघाले होते. ते बाहेरचे अन्न खात नसल्याने त्यांच्याजवळ केवळ फळे होती. ते पाहून सद्गुरु काकांनी जळगावला पोचण्यापूर्वीच शिरडोणकर दांपत्याला देण्यासाठी जळगाव सेवाकेंद्रातून जेवणाच्या डब्याची सोय केली. ‘तुम्ही दिलेले जेवण, म्हणजे मेहेरबाबांनी दिलेला प्रसादच होता. आम्ही ते कधीही विसरू शकत नाही’, असे शिरडोणकर दांपत्य आजही सांगते.

१ आ. इतरांचा विचार करणे

आम्ही चारचाकीने नंदुरबारहून जळगावला येत होतो. वाहन चालवत असतांना मला झोप येत होती. सद्गुरु काकांनी ‘तुम ही राम हो, तुम ही कृष्ण हो…’ हे गीत सिद्ध केले होते. मला झोप येऊ नये; म्हणून प्रथमच त्यांनी ते गीत म्हटले. त्यांचे ते भावविभोर शब्द कानी पडताच मला येणारी झोप पूर्णपणे गेली.

१ इ. सेवेत व्यस्त असूनही साधकांच्या अडचणी सोडवणे

सद्गुरु काका दिवसभर ‘ऑनलाईन’ सत्संगाचे चित्रीकरण आणि अन्य सेवा यांमध्ये व्यस्त असायचे, तरी ते साधकांना संपर्क करून त्यांच्या साधनेतील अडचणी सोडवायचे. रात्री कितीही उशिरापर्यंत सेवा असल्या, तरी ते पहाटे ४.३० वाजता उठून नामजप करून सेवेला सिद्ध रहायचे. ते तत्त्वनिष्ठतेने साधकांना त्यांच्या चुकांची जाणीव करून द्यायचे.

२. सौ. किरण वाघुळदे, जळगाव

सौ. किरण वाघुळदे

२ अ. सद्गुरु काकांची भेट झाल्यावर त्यांच्या विद्यार्थिनीने त्यांना वाकून नमस्कार करणे आणि यातून त्यांचे विद्यार्थ्यांशी असलेले प्रेमाचे अन् आदराचे नाते लक्षात येणे

सद्गुरु काका आणि त्यांच्या पत्नी सौ. जाधवकाकू यांना अकलूज (जिल्हा सोलापूर) येथे जायचे होते. ते चारचाकी वाहनाने जाणार होते; म्हणून त्यांनी मलाही समवेत नेले. गावातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा किल्ला आणि मंदिर दाखवत असतांना त्यांची एक विद्यार्थिनी भेटली. (सद्गुरु नंदकुमार जाधव हे अकलूज येथे शिक्षक होते. आता ते सेवानिवृत्त झाले आहेत.) तिने सद्गुरु काकांना वाकून नमस्कार केला. त्या भेटीतून त्यांचे विद्यार्थ्यांशी असलेले प्रेमाचे आणि आदराचे नाते माझ्या लक्षात आले.

२ आ. शाळा आणि गाव यांविषयीची आत्मीयता

सद्गुरु काका शिकवत असलेल्या अकलूज येथील शाळेत गेल्यावर काही विद्यार्थिनी वाद्य वाजवत होत्या. सद्गुरु काकांनी त्यांच्या समवेत एक गीत गायले. सर्व शिक्षक त्यांना आदराने नमस्कार करत होते. ‘अकलूज गावाची रचना उत्तम आहे’, असे सद्गुरु काका कौतुकाने सांगतात. यावरून त्यांची शाळा आणि गाव यांविषयीची आत्मीयता दिसून आली.

२ इ. साधकांच्या मनातील ओळखणे

शनिशिंगणापूरच्या रस्त्याने येत असतांना माझ्या मनात विचार आला की, मंदिरात जायला हवे. लगेच सद्गुरु काकांनी माझ्या मनातील विचार ओळखून आम्हाला शनि मंदिरात दर्शनासाठी नेले.

‘प.पू. गुरुमाऊलींच्या कृपेनेच सद्गुरु काकांच्या सहवासात त्यांची गुणवैशिष्ट्ये अनुभवता आली’, याविषयी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !

३. श्री. दत्तात्रेय वाघुळदे आणि सौ. किरण वाघुळदे, जळगाव

३ अ. सद्गुरु काका घरी रहायला येणार असल्याचे कळल्यावर ‘प.पू. गुरुदेवच घरी येणार आहेत’, असे वाटून कृतज्ञता व्यक्त होणे आणि सर्व कृती आश्रमात असल्याप्रमाणे होऊ लागणे

जळगाव येथील सेवाकेंद्राची डागडुजी चालू असल्याने काही दिवस सद्गुरु काका आणि अन्य साधक आमच्या घरी रहायला येणार होते. हे कळताच ‘प.पू. गुरुदेवच आपल्या घरी येणार आहेत’, असे वाटून आमच्याकडून कृतज्ञता व्यक्त झाली. आमच्याकडून सर्व कृती आश्रमात असल्याप्रमाणे होऊ लागल्या. घर बांधतांना वरच्या मजल्यावरील बांधकाम करण्याचा आमचा विचार नव्हता; मात्र आज ते साधकांसाठी उपयोगी पडल्याने ‘हे सर्व देवाचेच नियोजन आहे’, हे आमच्या लक्षात आले.

३ आ. बालसाधकांशी त्यांच्या वयाचे होऊन वागणे

कु. तेजश्री चौधरी आणि कु. स्वानंदी मांजरेकर या दोन्ही बालसाधिका सद्गुरु काकांच्या खोलीत सेवा करायला जायच्या. त्या वेळी सद्गुरु काका त्यांच्याशी हसून-खेळून वागायचे, त्यांचे कौतुक करायचे आणि त्यांना चुकांची जाणीवही करून द्यायचे. ते त्यांच्याकडील खाऊ त्यांना द्यायचे.

३ इ. अनुभूती

३ इ १. सद्गुरु काकांच्या संकल्पामुळे कुटुंब अपघातातून वाचल्याची अनुभूती येणे : सौ. किरण वाघुळदे हिच्या घशात गाठी झाल्याने तिला डोंबिवली (ठाणे) येथे उपचारासाठी न्यायचे होते. घरात साधक आणि सद्गुरु काका असल्याने डोंबिवलीला जाण्याविषयी आमच्या मनाचा संघर्ष होत होता. ते सद्गुरु काकांच्या लक्षात आले. ते आम्हाला म्हणाले, ‘‘जाऊन परत या.’’ परत येतांना आमच्या चारचाकी वाहनाचा मोठा अपघात झाला. वाहनाची स्थिती पहाता ‘यातून कुणीही वाचू शकत नव्हते’, असे स्थानिकांचे म्हणणे होते, तरीसुद्धा आमच्या कुटुंबातील आम्ही चार सदस्य सुखरूप घरी पोचलो. हे केवळ सद्गुरु काकांच्या संकल्पामुळे शक्य झाले.

३ इ २. पू. काका आमच्या घरात रहात असतांना तेथे प.पू. गुरुदेवांचे अस्तित्व जाणवत होते. आजही त्या खोलीत सुगंध येतो आणि दैवी कण दिसतात.’

‘सद्गुरु नंदकुमार जाधव’ यांच्या नावाचा साधिकेला सुचलेला भावार्थ ! 

श्रीमती उषा बडगुजर

दैव आनंदी असणारे ।

द्रवळते चैतन्य त्यांच्या माध्यमातून ।

गुगुणांची खाण असणारे ।

रुरुजविले बीज साधनेचे साधकांमध्ये ।

नंम्रता अन् प्रेमभाव असे त्यांच्या अंगी ।

रवळतो सुगंध सेवाकेंद्रात त्यांच्या सहवासातूनी ।

कु कुणालाही न दुखावणारे ।

मामार्गदर्शनातून गुरूंचे अस्तित्व जाणवून देणारे ।

ममाण होतात भक्तीगीतात ।

जाजावे त्यांच्या चरणी शरण ।

र्माचरणाचे बीज रोवले साधकांच्या मनात ।

रदहस्त आहे गुरुमाऊलींचा ।

काकाय वर्णावा महिमा त्यांचा ।

काकाकांच्या हसण्यातून मिळतो आनंद ।

– श्रीमती उषा बडगुजर, जळगाव (८.४.२०२१)

सद्गुरु जाधवकाकांची आठवण येते, तो क्षण असतो आनंदाचा ।

सौ. विमल कदवाने

सद्गुरु जाधवकाकांची आठवण येते, तो क्षण असतो आनंदाचा ।
चैतन्य देती ते सर्वांना, विसर पडतो मायेचा ॥ १ ॥

सद्गुरु काकांच्या बोलण्यातून झरा वहातो प्रेमाचा ।
त्यांच्या स्मित हास्यातून वर्षाव होतो प्रीतीचा ॥ २ ॥

त्यांच्या नेत्रांतून चैतन्य मिळूनी, भार हलका होतो देहाचा ।
चैतन्य देती ते सर्वांना, विसर पडतो मायेचा ॥ ३ ॥

ते रहाती सदा शिष्यभावात, त्यांच्या अंतरी ध्यास एकच गुरुदेवांचा ।
शिकवतात ते स्वत:च्या कृतीतून, भाव कसा असावा शिष्याचा ॥ ४ ॥

त्यांच्या मार्गदर्शनाने तळमळ, उत्साह वाढतो सेवेचा ।
योग्य दृष्टीकोन देऊनी, मार्ग दाखवती ते प्रगतीचा ॥ ५ ॥

व्यष्टी साधनेचा आढावा घेऊन,पाया पक्का करतात ते सर्वांच्या साधनेचा ।
चैतन्य देती ते सर्वांना, विसर पडतो मायेचा ॥ ६ ॥

आम्हाला तरण्यासाठी साथ आवश्यक आहे सद्गुरु काकांची ।
धर्मप्रचार करूनी, नवी दिशा देऊनी, विश्‍वास वाढवतात ते सर्वांचा ।
सत्संग आम्हा आवडतो, अनमोल सद्गुरु जाधवकाकांचा ॥ ७ ॥

वातावरणात चैतन्य, भाव निर्माण होऊनी, तो क्षण असतो आनंदाचा ।
त्यांच्या चरणावर कृतज्ञतारूपी पुष्प वहातो, शिरी असावा हात कृपेचा ।
चैतन्य देती ते सर्वांना, विसर पडतो मायेचा ॥ ८ ॥

परात्पर गुरूंनी सद्गुरु काकांसाठी दिला विचार कविता लिहिण्याचा ।
अनंत कोटी कृतज्ञता त्या ब्रह्मांडनायकाला ॥ ९ ॥

– सौ. विमल विलासचंद्र कदवाने, बुर्‍हानपूर, मध्यप्रदेश. (३०.७.२०१९)

  • दैवी कण : सात्त्विक व्यक्ती, स्थान आदी ठिकाणी सोनेरी, रूपेरी आदीव्यांच्या प्रमाणावरून शोधलेले त्यांचे ‘फॉर्म्युले’ सध्या अस्तित्वात असलेल्या कोणत्याही कणांच्या ‘फॉर्म्युल्या’शी मिळतीजुळती नाहीत. त्यामुळे हे कण नाविन्यपूर्ण आहेत, हे लक्षात येते. साधक या कणांना ‘दैवी कण’ असे संबोधतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक