रुग्णाईत असतांना भाववृद्धीसाठी प्रयत्न करून गुरूंची कृपा अनुभवणारे देहली येथील ६२ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. प्रणव मणेरीकर !

श्री. प्रणव मणेरीकर

१. श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी सांगितल्याप्रमाणे ‘गुरुकृपा हाच आपल्यासाठी प्राणवायू आहे’, असा भाव ठेवण्याचा प्रयत्न करणे

‘गेल्या २० दिवसांत रुग्णाईत असतांना माझ्या शरिरातील प्राणवायू (ऑक्सिजन) आणि प्राणशक्ती न्यून असायची. त्या वेळी मी बातम्यांतून ऐकले होते, ‘प्राणवायूची आवश्यकता भासल्यास रुग्णालयात भरती व्हावे लागते आणि तेथे सिलिंडरद्वारे प्राणवायू दिला जातो, तसेच प्राणवायू बर्‍याच रुग्णालयांमध्ये उपलब्ध नाही.’ तेव्हा श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे ‘गुरुकृपा हाच आपल्यासाठी प्राणवायू आहे’, हे वाक्य मला आठवले. त्याप्रमाणे भाव ठेवण्याचा माझ्याकडून प्रयत्न झाला.

२. रुग्णाईत असतांना ‘स्थुलातील औषधांपेक्षा गुरुदेवांची कृपा असणे आणि त्यांना शरण जाणे’ अधिक महत्त्वाचे आहे’, असा विचार येणे अन् गुरूंना प्रार्थना केल्यावर प्राणशक्ती आणि उत्साह वाढणे

‘बुद्धीने विचार करता स्थुलातून औषधे, प्राणवायू इत्यादी शरिरासाठी आवश्यक आहे; पण यांपेक्षाही ‘गुरुदेवांची कृपा असणे, तसेच त्यांना शरण जाणे’ महत्त्वाचे आहे’, असे विचार माझ्या मनात येऊन माझ्याकडून तशी प्रार्थना व्हायची. श्री गुरूंचे चरण धरून त्यांना माझ्याकडून आत्मनिवेदन व्हायचे. असे केल्याने माझी प्राणशक्ती पुन्हा वाढायची आणि मनावर आलेली मरगळ न्यून होऊन उत्साह वाढायचा अन् मला पुन्हा बरे वाटायचे.

३. रुग्णाईत असतांना केलेले भावप्रयोग

. मी स्वतःच्या हृदयाभोवती नामजपाचे सूक्ष्मातून मंडल काढले. श्वासनलिकेतून सूक्ष्मातून नामजप सोडला. हे भावप्रयोग केल्याने मला लवकर बरे वाटायचे.

आ. ‘सनातनच्या सर्व संतांना सूक्ष्मातून चरणस्पर्श करून नमस्कार करणे आणि त्यांना ‘सदैव कृपादृष्टी राहू दे’, अशी प्रार्थना करणे’, यांमुळेही मला पुष्कळ लाभ झाला.

४. संत आणि साधक यांच्या माध्यमातून गुरुदेवांची प्रीती अनुभवणे

काही साधकांच्या माध्यमातून श्री गुरूच माझी सर्व काळजी घेत होते. ‘खायला-प्यायला काही हवे का ? औषध हवीत का ? फळे हवीत का ?’, असे सर्व जण मला विचारायचे आणि द्यायचेही. मला साधकांच्या माध्यमातून गुरुदेवांची प्रीती अनुभवता आली. माझ्या त्रासाच्या तीव्रतेनुसार संत मला जप सांगायचे. तो जप केल्यानेही मला लाभ झाला. सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी भ्रमणभाष करून माझ्या प्रकृतीची चौकशी केली. यांतून संतांची प्रीती मला अनुभवता आली.

४. वैद्या (कु.) अपर्णा महांगडे यांनी शारीरिक समस्यांचे अचूक निदान करून योग्य औषध दिल्याने प्रकृती सुधारणे आणि ‘आयुर्वेद महत्त्वाचा !’ या श्री गुरूंच्या वचनाची प्रचीती येणे

वैद्या (कु.) अपर्णा महांगडे यांनी माझ्या शारीरिक त्रासांवर मला अचूक आयुर्वेदीय औषधे दिली. माझ्या कफातून काही प्रमाणात रक्त यायचे. ताईंनी दिलेल्या औषधामुळे २ दिवसांत कफ सामान्य रंगाचा येऊ लागला आणि कफाचे प्रमाण न्यून झाले. हे सर्व होत असतांना ‘अचूक निदान करणे आणि योग्य औषधे देणे, तसेच रुग्ण लवकर बरे होण्याची तळमळ असणे’ हे गुण मला ताईंकडून शिकायला मिळाले. श्री गुरूंनी पूर्वीच सांगितले होते, ‘‘आयुर्वेद महत्त्वाचा !’’ हे मला अनुभवायला मिळाले.

‘हे प्रयत्न श्री गुरूंनी माझ्याकडून करवून घेतले आणि मला चैतन्य दिले, तसेच विविध माध्यमांतून प्रीती अनुभवण्यास दिली’, यांविषयी कोटीशः कृतज्ञता !’

– श्री. प्रणव मणेरीकर, देहली (११.५.२०२१)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक