तोरणा गडासह इतर राज्य संरक्षित स्मारकांवर यापुढे कुणालाही मुक्काम करता येणार नाही !

पुणे, १२ जून – तोरणा गडावरील तटबंदीच्या संवर्धन कार्यातील ३ फुटांचा काही भाग तसेच कोकण दरवाजा येथील भिंतीच्या काही भागास उपद्रवी पर्यटकांकडून हानी पोहोचवण्यात आली होती. याची नोंद घेऊन वेल्हा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हाही नोंद करण्यात आला होता. या प्रकरणाची तातडीने नोंद घेऊन पुरातत्व खात्याने भर पावसात गडावरील तटबंदी दुरुस्त केली होती. त्यामुळे तोरणा गडासह इतर राज्य संरक्षित स्मारकांवर यापुढे कुणालाही मुक्काम करता येणार नसल्याचे पुरातत्व विभागाने स्पष्ट केले आहे. तसा फलकही गडांच्या दर्शनी भागात लावण्यात येणार आहे. वन विभागालाही कारवाईच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

गेल्या काही वर्षांमध्ये गडभ्रमंती आणि मुक्कामी जाणार्‍यांचे प्रमाण वाढले आहे. त्यातच उपद्रवी पर्यटकांचा वावरही गडांवर वाढला आहे. गडांवर जाण्यासाठी अनेक वाटा असल्याने तसेच पुरातत्व विभाग आणि वन विभाग यांच्याकडे मनुष्यबळाची कमतरता असल्याने सरसकट सगळ्या वाटांवर लक्ष ठेवणे कठीण आहे. गडांवरील अपघात आणि उपद्रवाच्या घटना वाढल्याचे चित्र दळणवळण बंदीपूर्वी वाढले होते.

पुरातत्व विभागाचे साहाय्यक संचालक विलास वाहणे यांनी सांगितले की, सायंकाळी तोरणा गडाचे महाद्वार आणि कोकण दरवाजा कुलूपबंद करण्यात येणार आहे. तशा सूचना गडाचे पहारेकरी बापू साबळे यांना देण्यात आल्या आहेत.

राज्यातील सर्वच स्मारकांवर मुक्कामबंदी करावी आणि तो धुडकावणार्‍यांवर त्वरित कारवाई व्हावी, अशी मागणी भोर येथील रायरेश्‍वर प्रतिष्ठानचे अध्यक्ष तसेच दुर्ग संवर्धन समितीचे सदस्य राजू शेळके यांनी केली आहे.