मालाड (मुंबई) येथे इमारत कोसळून ८ मुलांसह ११ जणांचा मृत्यू, ७ जण घायाळ !

मुंबई – मालाड येथील अब्दुल हमीद रोड येथील झोपडपट्टीमध्ये असलेली ४ मजली इमारत ९ जूनच्या रात्री ११.१० वाजता कोसळली. यामध्ये ८ मुलांसह ११ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्घटनेत ७ जण गंभीर घायाळ झाले आहेत. मृत्यू झालेली मुले ३ ते १५ वर्षे वयोगटातील होती. घायाळ व्यक्तींवर रुग्णालयात उपचार चालू आहेत. अग्नीशमन दलाचे कर्मचारी आणि पोलीस यांच्याकडून घटनास्थळी साहाय्य चालू आहे. ही इमारत बाजूच्या घरावर कोसळली. ढिगार्‍याखाली अडकलेल्या काही व्यक्तींना बाहेर काढण्यात यश आले असून आणखी काही जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. यामुळे मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

मालाड येथील दुर्घटनेतील घायाळ व्यक्तींची मुख्यमंत्र्यांकडून विचारपूस

मृतांच्या कुटुंबियांसाठी शासनाकडून ५ लाख रुपयांचे अर्थसाहाय्य घोषित

घायाळ झालेल्या व्यक्तींची विचारपूस करतांना डावीकडून किशोरी पेडणेकर, आदित्य ठाकरे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, इक्बालसिंह चहल

१० जून या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कांदिवली येथील शताब्दी रुग्णालयात जाऊन घायाळ झालेल्या व्यक्तींची विचारपूस केली. या वेळी त्यांच्यासमवेत पालकमंत्री आदित्य ठाकरे, महापौर सौ. किशोरी पेडणेकर, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल, जिल्हाधिकारी मिलिंद बोरीकर हे उपस्थित होते. या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांसाठी शासनाकडून ५ लाख रुपयांचे अर्थसाहाय्य घोषित करण्यात आले आहे.