सनातनच्या कुडाळ येथील साधिका श्रीमती नलंदा खाडये यांचे निधन

श्रीमती नलंदा खाडये

कुडाळ – सनातनच्या सद्गुरु (कु.) स्वाती खाडये आणि हिंदु जनजागृती समितीचे पश्‍चिम महाराष्ट्र, कोकण, गोवा, गुजरात विभागाचे समन्वयक श्री. मनोज खाडये यांच्या मातोश्री ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती नलंदा वसंत खाडये (वय ८४ वर्षे) यांचे ६ जून या दिवशी सांगिर्डेवाडी, कुडाळ येथील निवासस्थानी निधन झाले. सकाळी दैनिक ‘सनातन प्रभात’चे वाचन केल्यानंतर त्या नामजपासाठी ध्यानमुद्रेत सोफ्यावर बसल्या होत्या. ध्यानमुद्रेच्या स्थितीतच त्यांचे निधन झाले. या ध्यानमुद्रा शेवटपर्यंत तशाच होत्या.

श्रीमती नलंदा खाडये यांचे पूर्ण कुटुंबच सनातनच्या माध्यमातून साधनारत आहे. श्रीमती खाडये या गेली २४ वर्षे साधना करत होत्या. दिवसभरातील ६ ते ८ घंटे व्यष्टी साधना, दैनिक वाचन, प्रतिदिन अग्निहोत्र करणे हा त्यांचा नियमितचा दिनक्रम असे. काही वर्षांपूर्वी गुरुपौर्णिमेसाठी अर्पण मिळवण्याची सेवा, दिनदर्शिका वितरण करणे या समष्टी सेवांमध्येही त्यांचा सहभाग असायचा. त्यांच्या पश्‍चात २ मुलगे, ३ मुली, सुना आणि नातवंडे, असा परिवार आहे. सनातन परिवार खाडये कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे.