पॉझिटिव्हिटीच्या आधारावर निर्बंध शिथिल होणार की, नाही हे ठरेल ! – अजित पवार

पुणे –  राज्यात दळणवळण बंदी संदर्भात संभ्रम निर्माण झाला असताना पॉझिटिव्हिटीच्या आधारावर निर्बंध शिथिल होणार की नाही हे ठरणार असल्याची महत्त्वपूर्ण माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. ज्या ठिकाणी कोरोना पॉझिटिव्हिटी दर ५ प्रतिशतच्या खाली आहे तेथील निर्बंध शिथिल करणार, तर जेथे १० प्रतिशतच्या पुढे पॉझिटिव्हिटी दर आहे तेथे पहिल्यासारखेच निर्बंध कायम रहाणार आहेत. तसेच दळणवळण बंदी संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा निर्णय अंतिम रहाणार असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांमधील रुग्णांच्या पॉझिटिव्हिटीचे प्रमाण ५ टक्‍क्‍यांपेक्षा अल्प असल्याने दोन्ही शहरांमध्ये निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय सोमवार ७ जून या दिवशी घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. पुणे आणि खडकी कॅन्टोन्मेंट परिसरातील निर्बंध शिथिल होणार आहेत; मात्र देहूरोड कॅन्टोन्मेंटमध्ये शिथिलता दिली जाणार नसल्याचे त्यांनी या वेळी स्पष्ट केले.