कोरोनाच्या संभाव्य तिसर्‍या लाटेला सामोरे जाण्याच्या पूर्वसिद्धतेसाठी ‘कृती दला’ची बैठक

बालरोगतज्ञ अन् परिचारिका यांना सोमवारपासून विशेष प्रशिक्षण देण्याचा निर्णय

पणजी, ५ जून (वार्ता.) – कोरोनाची संभाव्य तिसरी लाट बालकांना लक्ष्य करू शकते. कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचा सामना करण्यासाठी ७ जूनपासून खासगी आणि सरकारी बालरोगतज्ञ अन् परिचारिका यांच्यासाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रम चालू करण्याचा निर्णय ‘कृती दला’च्या बैठकीत झाला. कोरोनाच्या तिसर्‍या लाटेला सामोरे जाण्यासाठी हे कृती दल स्थापन करण्यात आले आहे. १० वर्षांच्या वयोगटातील मुलांच्या पालकांचे प्राधान्याने लसीकरण करण्याचा निर्णयही या बैठकीत झाला. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे, गोमेकॉचे अधिष्ठाता (डीन) डॉ. शिवानंद बांदेकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.

याविषयी अधिक माहिती देतांना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, ‘‘राज्यात सरकारी आणि खासगी सेवा देणारे १२० बालरोगतज्ञ आहेत. कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचा सामना करण्यासाठी बालरोगतज्ञ आणि परिचारिका यांना प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. या प्रशिक्षणामध्ये व्हेंटिलेटरसह अन्य उपकरणे कशी हाताळावी ? कोरोनाबाधित रुग्णांना उपचार कसे द्यावेत ? आदींविषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. रुग्णालयांमध्ये आवश्यक असलेल्या उपकरणांची सूची सिद्ध करण्यात आली असून याची खरेदी १० जूनपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. सुपर स्पेशालिटी रुग्णालयात मुलांसाठी विशेष खाटांची व्यवस्था केली जाणार आहे.’’