महाविद्यालयातील तरुणांना राष्ट्र आणि धर्म यांविषयीचे सामान्य ज्ञानही नाही !

आज महाविद्यालयात जाणार्‍या बहुसंख्य विद्यार्थ्यांचे वाचन, सामान्य ज्ञान, राष्ट्राच्या समस्याविषयीचे ज्ञान, राष्ट्राविषयीची सर्वसामान्य माहिती आदी न्यून आहे. सध्याची शिक्षणपद्धती घोकमपट्टी करणारी आणि स्पर्धात्मक झाल्याचा हा परिणाम आहे. राष्ट्र, धर्म यांविषयी अभिमान निर्माण होणारे शिक्षण तरुणांना दिले जात नाही. राष्ट्र आणि धर्म यांविषयीचे सामान्य ज्ञानही बहुसंख्य तरुणांना नसते, असे लक्षात येते.

भारताचे ५० टक्के तरुणही सांगू शकत नाहीत राष्ट्रध्वजातील रंग !

हा आहे गेल्या ७४ वर्षांमध्ये राजकारण्यांनी जनतेमध्ये राष्ट्रभक्ती निर्माण न केल्याचा परिणाम !

‘पोद्दार इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन’ या संस्थेने नुकतेच १८ ते २३ वर्षीय तरुणांचे सर्वेक्षण केले. त्यानुसार मुंबई येथील १० टक्के, बेंगळुरू येथील १२ टक्के, तर चेन्नई येथील केवळ ८ टक्के तरुणांनाच तिरंगा राष्ट्रध्वजाचे रंग ठाऊक आहेत, तसेच या शहरांतील ४० टक्क्यांहून अल्प लोकच योग्य प्रकारे राष्ट्रगीत म्हणू शकत असल्याचे दिसून आले आहे.’


हिंसा करणार्‍या दादाला (हिरोला) नव्हे, तर संतांना आदर्श मानणारी पिढी घडवणे आवश्यक !

‘भारत हा सर्वाधिक युवा असलेला देश आहे. देशाकडे ६० ते ७० टक्के युवाशक्ती असली, तरी केवळ २ ते ३ टक्के कौशल्यपूर्ण शिक्षण प्राप्त केलेले युवा आहेत. स्थिती खालावलेल्या शासकीय शाळांच्या तुलनेत दर्जा चांगला असलेल्या विनाअनुदानित शाळांनी शासकीय अनुदानाचा हव्यास धरू नये. सध्या हिंसा करणारा अवगुण असलेला दादा मुलांचा आदर्श (हिरो) असतो. सध्याचे शिक्षण मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करत नाही. ही स्थिती पालटून संतांना आदर्श मानणारी पिढी आम्हाला घडवायची आहे.’