पाल्याचे वय १० वर्षे किंवा त्याहून अल्प असल्यास पालकांसाठी लसीकरणास प्राधान्य
पणजी, ४ जून (वार्ता.) – देशात कोरोना लसीकरण पूर्ण करणारे गोवा राज्य हे पहिले राज्य बनवण्याचे ध्येय शासनाने ठेवले आहे, असा दावा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केला आहे. ते पुढे म्हणाले, ‘‘पाल्याचे वय १० वर्षे किंवा त्याहून अल्प असणार्या पालकांना लसीकरणासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे.’’
राज्यात संचारबंदीत वाढ करण्याविषयीचा निर्णय ६ जून या दिवशी घेणार
कोरोना महामारीसंदर्भातील आढावा घेऊन राज्यात संचारबंदीत वाढ करण्याविषयीचा निर्णय ६ जून या दिवशी घेतला जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पुढे दिली. राज्यात ९ मेपासून राज्यस्तरीय संचारबंदी लागू करण्यात आली. ती ७ जून या दिवशी सकाळी ७ वाजेपर्यंत लागू आहे.
गोवा विद्यापीठ आणि संलग्न महाविद्यालये शिक्षक अन् शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासाठी पुन्हा खुली
कोरोना महामारी आटोक्यात येत असल्याने उच्च माध्यमिक संचालनालयाने ४ जून या दिवशी परिपत्रक काढून संचालनालयाशी निगडित सर्व शैक्षणिक संस्था, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासाठी ७ जूनपासून खुल्या करण्याचा निर्णय घोषित केला आहे. महाविद्यालये ८ जून या दिवशी, तर गोवा विद्यापीठ ७ जून या दिवशी खुले होणार आहे; मात्र सर्व ठिकाणी ‘शिकवणे आणि शिकणे’ हे ‘डिजिटल’ माध्यमांतून होणार आहे. या शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेशबंदी आहे.
शिक्षकेतर कर्मचार्यांनी ७ जूनपासून शाळेत उपस्थित रहाण्याचा आदेश
शासकीय शैक्षणिक संस्था आणि अनुदानित शैक्षणिक संस्था यांचे व्यवस्थापन अन् शिक्षकेतर कर्मचारी यांनी ७ जूनपासून शाळांमध्ये उपस्थित रहाण्याचा आदेश शिक्षण खात्याने प्रसारित केला आहे.