वाहन भाड्याने देतो असे सांगून अनेकांची फसवणूक !

पिंपरी – दळणवळण बंदीमुळे वाहनधारकांना काम नसल्याने तसेच प्रवास होत नसल्याने अनेकांच्या गाड्या घरासमोरच उभ्या होत्या. याचा अपलाभ घेत पिंपरी-चिंचवडमधील एका टोळीने गाड्या भाड्याने लावतो, असे आमिष वाहनधारकांना दाखवले. उपासमारी टाळण्यासाठी वाहनधारकांनी त्यांच्या गाड्या दिल्या; मात्र या टोळीने गाड्या परस्पर विकल्या. कुणी गाड्यांविषयी विचारल्यास त्यांना मारहाणही केल्याची माहिती पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी दिली. सुनील राखपसरे यांनाही असाच अनुभव आल्याने त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी आरोपींकडून १ कोटी २० लाखांच्या १६ गाड्या शासनाधीन केल्या आहेत. या प्रकरणी पोलिसांनी ६ जणांना कह्यात घेतले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर काटे आणि विश्वजीत खुळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलीस पुढील तपास करत आहेत.