कन्नड भाषेविषयी अपशब्द वापरणार्‍या गूगलकडून क्षमायाचना !

नवी देहली – गूगल या जगातील सर्वांत मोठ्या ऑनलाइन ‘सर्च इंजिन’ने कन्नड भाषेला ‘भारतातील सर्वांत घाणेरडी भाषा’ असे म्हटले होते. यास भारतियांकडून, तसेच कर्नाटक सरकारकडून विरोध झाल्यानंतर गूगलने भारतियांची क्षमा मागितली आहे. गूगलने म्हटले आहे, ‘हे आस्थापनाचे विचार नसून एक तांत्रिक बिघाड होता.’ गूगलवर जेव्हा लोकांनी ‘भारतातील सर्वांत घाणेरडी भाषा’, असे सर्च केले असता उत्तरामध्ये ‘कन्नड भाषा’ असे दिसून येत होते.

‘गूगल इंडिया’च्या प्रवक्त्यांनी म्हटले की, गूगलच्या ‘सर्च इंजिन’मध्ये दिसणार्‍या अनेक गोष्टी सत्यच असतात, असे नाही. अनेकदा इंटरनेटवर विचारलेल्या प्रश्‍नांची धक्कादायक उत्तरे येतात. हे चुकीचे असल्याचे आम्ही मान्य करतो. तरीही अशा गोष्टींची तक्रार मिळताच ती चूक सुधारली जाते, तसेच गूगलच्या ‘एल्गोरिदम’मध्ये आम्ही सातत्याने सुधारणा करत आहोत. गूगलचे स्वतःचे विशिष्ट असे काहीच विचार नाहीत. तरीही अपसमजातून लोकांची मने दुखावली आहेत. त्याविषयी आम्ही क्षमा मागतो.