मुंबईसह राज्यातील अन्य पालिकांच्या निवडणुका लढवणार ! – राज ठाकरे, अध्यक्ष, मनसे

मनसे अध्यक्ष राज ठाकरे

मुंबई – कोरोनामुळे सर्व वातावरण अस्थिर आहे. लोकांमध्ये भीती आहे. समाज अस्थिर असतांना निवडणुका घेणे कितपत योग्य ? याचाही विचार झाला पाहिजे; पण जेव्हा केव्हा निवडणुका होईल, तेव्हा मनसे पूर्ण ताकदीने या निवडणुका लढवेल. मुंबईसह राज्यातील अन्य पालिकांमध्येही मनसे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटले. दैनिक ‘लोकसत्ता’ला दिलेल्या ऑनलाईन मुलाखतीमध्ये राज ठाकरे यांनी वरील वक्तव्य केले.

या वेळी राज ठाकरे म्हणाले की,

१. कलम ३७० रहित करणे, राममंदिर या सूत्रांवर मी केंद्रशासनाचे अभिनंदन केले; पण कोरोना असो किंवा वादळग्रस्तांना साहाय्य केंद्रशासन दुजाभाव करत आहेत, हेच स्पष्टपणे दिसले.

२. तौक्ते चक्रीवादळानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातच्या दौर्‍यावर गेले आणि १ सहस्र कोटी रुपयांचे साहाय्य घोषित केले, मग महाराष्ट्रात का आले नाहीत ? ते देशाचे पंतप्रधान आहेत ना ? मग संकटकाळात राज्याराज्यांमध्ये डावे-उजवे कशासाठी ? ‘रेमडेसिविर’ लसींवर केंद्र सरकारचे नियंत्रण कशासाठी ? राज्यांना व्यवस्था करू दे. तुम्ही केवळ ‘राज्य स्वत:चे दायित्व नीट पार पाडत आहेत कि नाहीत ?’, ते बघा.

३. मराठीचे सूत्र आजही आमच्या केंद्रस्थानी आहे. प्रत्येक मराठी माणसाने मराठीसाठी योगदान दिले, तर मराठीचे हित होईल. कोरोनाच्या कालावधीत वृत्तवाहिन्यांवर जे नकारात्मक दाखवण्यात येत होते, त्याचा लोकांच्या मनावर अधिकच परिणाम झाला. अशा वेळी वृत्तवाहिन्यांचीही टाळेबंदी हवी होती.