१० वीचा निकाल १३ जुलै या दिवशी घोषित करणार ! – गोवा शालांत मंडळ

शाळांनी ६ जूनपूर्वी निकाल समिती स्थापन करण्याचे निर्देश

पणजी, २ जून (वार्ता.) – इयत्ता १० वीचा निकाल १३ जुलै या दिवशी जाहीर करणार असल्याची माहिती गोवा शालांत मंडळाचे अध्यक्ष भगीरथ शेट्ये यांनी दिली आहे. याअनुषंगाने गोवा शालांत मंडळाने प्रत्येक शाळांना ६ जून किंवा त्यापूर्वी अंतर्गत निकाल समिती नेमणे आणि या समित्यांनी २६ जूनपर्यंत अंतर्गत मूल्यमापन करून गुण गोवा शालांत मंडळाला सुपुर्द करण्याचे निर्देश दिले आहेत.

गोवा शालांत मंडळाने मंडळाची १० वीची परीक्षा रहित केल्याच्या पार्श्‍वभूमीवर १ जून या दिवशी १० वीच्या विद्यार्थ्यांचा अंतर्गत मूल्यांकनाच्या आधारे निकाल सिद्ध करण्यासाठी योजनेचा मसुदा प्रसिद्ध केला आहे. जे विद्यार्थी अंतर्गत मूल्यांकनावर नाखूष आहेत, त्यांना परीक्षेला बसण्यासाठी संधी दिली जाणार आहे. ही परीक्षा जेव्हा परिस्थिती अनुकूल होईल, त्या वेळी घेतली जाणार असल्याचे मंडळाने म्हटले आहे.