पणजी, २ जून (वार्ता.) – विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि सुरक्षा यांसाठी गोवा शालांत मंडळाची १२ वीची परीक्षा रहित करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी घोषित केले. गोवा शासनाने गोवा शालांत मंडळाच्या १२ वी इयत्तेच्या निकालाच्या निर्णयासाठी ‘सी.बी.एस्.ई.’ आणि मानव संसाधन विकास मंत्रालय यांच्याकडे लेखी स्वरूपात समन्वय केला होता. या वेळी परीक्षा रहित करणे किंवा जे विद्यार्थी इच्छुक आहेत, त्यांना परीक्षा देण्यास अनुमती देणे आणि जे विद्यार्थी परीक्षा देण्यास इच्छुक नाहीत, त्यांचा अंतर्गत मूल्यांकनावर आधारित निकाल घोषित करणे किंवा दोन्ही निकाल एकत्र घोषित करणे, असे तीन पर्याय ठेवण्यात आले होते. या दोघांकडून निर्णय आल्यानंतरच परीक्षा रहित करण्याचा निर्णय घेण्यात आला. गोवा शालांत मंडळाने १० वी इयत्तेच्या परीक्षा यापूर्वीच रहित केल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत केंद्रशासनाने १ जून या दिवशी ‘सी.बी.एस्.ई.’च्या विद्यार्थ्यांसाठी मंडळाची १२ वी इयत्तेची परीक्षा रहित करण्याचा निर्णय घेतला आहे.