कोरोनाबाधित नसणार्या रुग्णांना चांगले उपचार आणि पर्यायाने योग्य शिक्षण न मिळाल्याचा आरोप
नागपूर – येथील इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात (मेयो) कोरोनाचे रुग्ण अल्प झाल्यावरही कोरोनाबाधित नसलेल्या रुग्णांसाठी खाटा वाढवल्या जात नाहीत. तसे केल्याने पदव्युत्तरच्या विविध अभ्यासक्रमांत येथे प्रवेश घेतल्यावरही दीड वर्षापासून केवळ कोरोनाबाधित रुग्णांवरच उपचाराचा भर दिला जात आहे. त्यामुळे ‘येथील कोरोनाबाधित नसणार्या रुग्णांना उपचार मिळण्यात अडचणी येतात, तसेच योग्य शिक्षण घेता येत नाही’, असा आरोप करत मेयोतील २०० हून अधिक निवासी आधुनिक वैद्य १ जूनपासून सामूहिक रजेवर गेले आहेत.
अत्यवस्थ रुग्णांना आधुनिक वैद्यकीय सेवा देत असल्याचा दावा आंदोलकांनी केला आहे. ‘मार्ड’च्या नेतृत्वाखाली हे आंदोलन चालू करण्यात आले आहे. ‘मेयो रुग्णालयातील अत्यवस्थ रुग्ण असलेल्या अतीदक्षता विभागासह इतर काही ठिकाणी निवासी आधुनिक वैद्यांकडून सेवा चालू ठेवली जाणार आहे’, असे आंदोलकांनी सांगितले.