वीरपत्नीचे स्वागत !

वर्ष २०१९ मध्ये पुलवामा येथे झालेल्या आतंकवादी आक्रमणात मेजर विभूती शंकर धौंडियाल हे हुतात्मा झाले होते. या आक्रमणाच्या केवळ ९ मासांपूर्वीच त्यांचा निकिता कौल यांच्याशी विवाह झाला होता. हुतात्मा मेजर धौंडियाल यांच्या पत्नी निकिता कौल यांच्यासाठी हा मोठा धक्का होता. तरी परिस्थितीला शरण न जाता स्वत:ला सावरून निकिता कौल यांनी पतीच्या पावलावर पाऊल टाकत सैन्यात जाण्याचा निर्णय घेतला. त्यापूर्वी त्या एका बहुराष्ट्रीय आस्थापनात कामाला होत्या. २ दिवसांपूर्वी त्यांनी सैन्यातील खडतर प्रशिक्षण पूर्ण केले आणि एका विशेष समारंभात सैन्यात प्रवेश केला. दीड-दोन वर्षांपूर्वी हुतात्मा मेजर धौंडियाल यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी आणल्यावर डोक्यावर पदर घेतलेल्या निकिता कौल यांनी अश्रू न ढाळता, पतीला कडक ‘सॅल्यूट’ ठोकला आणि ‘माझे तुमच्यावर प्रेम आहे’ असे सांगत जणू पतीशी एकरूप होण्यासाठी सैन्यात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे त्यांनी अल्प कालावधीत हा निर्णय कृतीत आणलाही !

स्वतःचा आणि राष्ट्राचाही उत्कर्ष !

निकिता कौल

सैन्यात प्रवेश करणे तसे सोपे नाही. त्यासाठी आधी कठीण अशी लेखी परीक्षा आणि त्यानंतर खडतर असे प्रशिक्षण असते. निकिता कौल यांनी सर्व लेखी परीक्षा उत्तीर्ण करून प्रशिक्षण पूर्ण केले आणि विशेष म्हणजे यात त्यांनी कोणतीही सवलत, पतीच्या मेजर असल्याचा अन् त्यांचे निधन झाल्यामुळे मिळालेल्या सद्भावनेचे भांडवल म्हणून उपयोग केला नाही. ही गोष्ट विरळच आहे. पती-पत्नीमधील नाते हे प्रेमाचे आणि विश्‍वासाचे असते. व्यक्तीगत पातळीवरील या प्रेमाच्या कक्षा रुंदावल्या आणि त्याचे राष्ट्रप्रेमात रूपांतर झाल्यास स्वतःचा उत्कर्ष होतोच; मात्र राष्ट्राचाही उत्कर्ष होतो, याचे हे उत्तम उदाहरण होय. त्यामुळे त्यांचे सैन्याकडून, सामाजिक माध्यमांतूनही कौतुक होत आहे.

वीरपत्नीने साहाय्य नव्हे आशीर्वाद मागणे

२ वर्षांपूर्वी एका प्रसिद्ध वाहिनीने सैन्यात हुतात्मा झालेल्यांच्या नातेवाइकांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यामध्ये महाराष्ट्रातील नुकताच विवाह झालेली आणि मेजर असलेला नवरा गमावलेली तरुण महिला व्यासपिठावर आली. तेव्हा तिने सांगितले की, हे दु:ख सहन करणे कठीण आहे; मात्र तरीही माझ्या पतीला मी रडत बसणे आवडणार नाही. मी एका मेजरची पत्नी आहे, यापेक्षा आणखी काही माझ्यासाठी मोठे नाही. मी सैन्यात भरती होण्यासाठी २ परीक्षा उत्तीर्ण झाले आहे, पुढील परीक्षा लवकरच देत आहे, त्यासाठी मला आशीर्वाद द्या.’ येथेही मेजरची पत्नी रडली नाही ना ‘मला साहाय्य करा’, असे म्हणून तिने लोकांपुढे हात पसरले. सैन्यातील अधिकार्‍यांच्या या तेजस्वी पत्नींनी एक गौरवास्पद आणि कौतुकास्पद पायंडा पाडला आहे. भारताच्या इतिहासात काही राज्यांचे दाखले आहेत. जेथे स्त्रियांनी युद्धात अथवा अन्य कारणाने पतीच्या निधनानंतर राज्यकारभार हाती घेतला आहे. गोंडवाना येथील राणी दुर्गावती, झांशीची राणी लक्ष्मीबाई, इंदूर राजघराण्याच्या राणी अहिल्याबाई होळकर ही काही अशा स्त्रियांची उदाहरणे आहेत. कौटुंबिक हानीत विलाप करण्यात जराही वेळ न दवडता कर्तव्य आणि प्रजेचे हित यांना श्रेष्ठ मानून त्या पदावर आरूढ झाल्या. वर उल्लेख केलेल्या तीनही राण्यांनी रणांगणात जाऊन शत्रूशी प्रत्यक्ष लढाईही केली आहे.

सैन्यातील पदासाठी कष्ट हवेत !

सरकारी नोकरीत कार्यरत पतीच्या निधनानंतर पत्नीला अथवा त्याच्या वारसाला नोकरी मिळते, सरकारी कोट्यातून घर मिळते. पती राजकारणात नगरसेवक, आमदार वा खासदार असेल, तर पत्नीलाही ते पद वारसाहक्काने मिळते. या ठिकाणी ही सर्व पदे लाभार्थी म्हणून आहेत, तर सैन्यात आरक्षण अथवा वशिल्यावर असे कोणतेच पद मिळणे अथवा काम न होता, स्वत:च्या कष्टावर, जिद्दीवर ते मिळवावे लागते. पतीच्या निधनानंतर पत्नीला सर्व भावनांना तिलांजली देत सैन्यात भरती होऊन स्वत:ला सैन्यासाठी सिद्ध करावे लागते, ते किती कठीण असेल ? याची कल्पनाही करता येणार नाही.

महाराष्ट्रातील कर्नल संतोष महाडिक काश्मीर येथे आतंकवाद्यांशी लढाई करतांना काही वर्षांपूर्वी हुतात्मा झाले. त्यांच्या निधनामुळे २ मुले असलेल्या स्वाती महाडिक खचल्या नाहीत. ‘पती ज्या देशसेवेच्या मार्गाने गेले, त्याच मार्गाने मीसुद्धा जाईन आणि त्यांचे कार्य पूर्णत्वाला नेईन’, असा त्यांनी निश्‍चय केला. त्यासुद्धा देशसेवेसाठी खडतर प्रशिक्षण घेऊन सैन्यात भरती झाल्या. ‘त्यांचे वय अधिक असल्याने त्या सैन्याचे खडतर प्रशिक्षण पूर्ण करू शकतील कि नाही’, अशी सैन्य आणि त्यांचे कुटुंबीय यांना काळजी होती; मात्र लेफ्टनंट स्वाती महाडिक यांनी जिद्दीच्या जोरावर हे प्रशिक्षण पूर्ण केले. ‘कर्नल संतोष यांचे आशीर्वाद माझ्या समवेत आहेत. त्यामुळे मला सैन्यात कुठलीच अडचण येणार नाही’, असा विश्‍वास लेफ्टनंट स्वाती महाडिक यांनी व्यक्त केला. या आणि अशा अनेक वीरांगना पतीच्या समवेत स्वत:ही देशसेवेत झोकून देण्यासाठी स्वत:ला सिद्ध करत आहेत.

गुणी आणि पराक्रमी भारतीय स्त्री

ज्यांनी आयुष्यात कधी बंदुकीचा चाप ओढला नाही, कधी परेडमध्ये सहभाग घेतला नाही, कधी मातीत वा चिखलात लोळण घेतली नाही, त्यांनी त्या क्षेत्रात अधिकारीपदापर्यंत जाणे आणि नेतृत्व करणे, हे आव्हानात्मक आहे. हे आव्हान पेलण्याची शक्ती अजूनही भारतीय स्त्रियांमध्ये आहे, ही गोष्ट आशेचा किरण आहे. सैन्याचा कोणताही अधिकारी अथवा सामान्य सैनिक यांच्या मुखी (पोट भरण्यासाठी नव्हे, तर) देशसेवेसाठी सैन्यात भरती होत आहे, असे विधान असते. सैन्याकडे देशसेवेचे माध्यम म्हणून पाहिले जाते. अनेक मास आणि कधी वर्ष कुटुंबियांपासून दूर राहून प्रतिकूल परिस्थितीत, प्राण तळहातावर घेऊन देशसेवा करणे सामान्याच्या अवाक्यातील काम नाही. जेव्हा वैयक्तिक भावनांचा त्याग करून व्यक्ती व्यापक अशा राष्ट्र आणि धर्म प्रेमाने झपाटते, तेव्हा तिच्यातील सुप्त शक्ती अनेक पटींनी कार्यरत होते. भारतीय स्त्रीमध्ये दुर्गा, चंडी यांचा अंश आहे, असे मानले जाते. तिच्यातील देवीतत्त्व, दुर्गातत्त्व अशा प्रसंगांमध्ये जागृत होऊन राष्ट्रकार्यासाठी कृतीप्रवण होत आहे, हा भारत देशासाठी आशेचा किरण आहे. अशा या देवीतत्त्वाने भारलेल्या भारतीय स्त्रीची शासन-प्रशासन यांनी योग्य ती काळजी घ्यावी, हीच सामान्य भारतियांची अपेक्षा आहे !