नगर शहराचे नाव ‘अंबिकानगर’ करण्यात यावे ! – महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना

‘अहमदनगर’चे नाव पूर्वी ‘अंबिकानगर’ असल्याचे शिवस्वराज्यात दाखले

स्वातंत्र्यानंतरच शहरांना असलेली मोगल आक्रमकांचीही नावे पालटायला हवी होती; मात्र सर्वपक्षीय सरकारांनी त्याकडे दुर्लक्ष केले. आता तरी राज्य सरकारने विदेशी आक्रमकांनी ठेवलेली नावे पालटून शहरांना प्राचीन हिंदु नावे द्यायला हवीत !

नगर – ‘अहमदनगर’ शहराचे नाव पूर्वी ‘अंबिकानगर’ असे होते. त्याचे दाखले शिवस्वराज्यातही मिळतात. त्यामुळे अहमदनगरचे नाव हे अंबिकानगर झालेच पाहिजे. अशी मागणी करत २८ मे या नगर शहर स्थापनेच्या दिवशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शहराच्या नामांतराचे सूत्र लावून धरले आहे. मनविसेचे जिल्हाध्यक्ष सुमित वर्मा यांनी शहरातील कायनेटिक चौकात व्ही.आर्.डी.ई.ने (वाहन संशोधन आणि विकास संस्था) चौकात उभारलेल्या ‘सर्कल’ भोवती ‘अहमदनगर शहराला ‘अंबिकानगर’ असे नाव द्यावे’, अशी मागणी करणारा फलक उभा केला.

सुमित वर्मा यांनी सांगीतले की, अहमदनगरचे नाव बदलून अंबिकानगर करावे यासाठी हिंदुत्वनिष्ठ संघटना आक्रमक आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने नामांतराच्या सूत्रावरून अनेक वेळा आंदोलने केली आहेत. शहर स्थापनादिनी अंबिकानगर नामकरणाचे फलक लावून आम्ही प्रशासन, राज्य सरकार यांचे लक्ष वेधले आहे. तसेच अंबिकानगर असे नामकरण होण्यासाठी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली लवकरच जनआंदोलन उभारू.