राज्यातील कोरोनाविषयक महत्त्वपूर्ण घडामोडी

मार्च २०२१च्या मध्यापर्यंत १७ वर्षांपर्यंतच्या १६ सहस्र २४६ जणांना कोरोनाचा संसर्ग

१७ वर्षांपर्यंतच्या तरुणांना कोरोनाचा संसर्ग ( प्रतिकात्मक चित्र )

राज्यात मार्च २०२१ च्या मध्यापर्यंत १७ वर्षांपर्यंतच्या १६ सहस्र २४६ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला, तर यामधील १५० जणांना उपचारासाठी रुग्णालयात भरती करावे लागले, अशी माहिती शासकीय अधिकारी डॉ. मिमी सिल्वेरा यांनी दिली.डॉ. मिमी सिल्वेरा पुढे म्हणाल्या, ‘‘कोरोनाच्या संभाव्य तिसर्‍या लाटेमध्ये १ ते २ टक्के रुग्णांची प्रकृती अत्यव्यस्थ होण्याची अपेक्षा आहे. राज्याच्या आरोग्य खात्याने गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात अतीदक्षता विभागासाठी ३० खाटा उपलब्ध करून ठेवल्या आहेत, तसेच ‘एन्.आय.सी.यु.’ आणि ‘हाय को-डिपेंडन्सी’ विभाग निर्माण केले आहेत. या वेळी प्रकृती अत्यव्यस्थ असलेल्यांवर गोवा वैद्यकीय महाविद्यालयात, तर मध्यम स्वरूपात लक्षणे असलेल्यांवर जिल्हा रुग्णालयांमध्ये उपचार करण्यात येणार आहेत.’’

उद्यापासून पुन्हा कोरोना लसीकरण मोहिमेला प्रारंभ

कोरोना लसीकरणासंबंधी ‘टीका उत्सवा’चाच पुढील भाग म्हणून राज्यशासन २६ मेपासून पुढील १० दिवस राज्यात ४५ वर्षांहून अधिक वयोगटातील लोकांसाठी कोरोना लसीकरण मोहीम पुन्हा राबवणार आहे. राज्यातील १६४ पंचायतींद्वारे ही मोहीम राबवण्यात येणार आहे, अशी माहिती राज्यशासनाचे अधिकारी डॉ. राजेंद्र बोरकर यांनी दिली.

सामूहिक रोगप्रतिकारशक्ती निर्माण होण्यासाठी राज्यातील ६० टक्के लोकांचे लसीकरण होणे आवश्यक

सामूहिक रोगप्रतिकारशक्ती निर्माण होण्यासाठी (हर्ड इम्युनिटी) राज्यातील ६० टक्के लोकांनी कोरोनाची लस घेणे आवश्यक आहे; मात्र अजूनही लोक कोरोनाची लस घेण्यासाठी पुढे येत नाहीत. प्रत्येक लसीला परिणाम (साईड इफेक्ट) हे असतातच, हे प्रत्येकाने ध्यानात ठेवावे, असे आवाहन शासकीय अधिकारी डॉ. जगदीश काकोडकर यांनी केले आहे.