आषाढी यात्रेच्या निमित्ताने पंढरपूर (सोलापूर) येथे मोठ्या प्रमाणात यात्रा भरते. लाखो वारकरी आणि भाविक अत्यंत श्रद्धेने एकत्रित येतात; मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने घातलेल्या कठोर निर्बंधामुळे संपूर्ण वर्षभरात केवळ आषाढीच काय, तर अन्य कोणतीही यात्रा भरली नाही. अतिशय व्याकुळतेने पांडुरंगाचे दर्शन घेण्यासाठी एकादशीची वाट पहाणार्या वारकर्यांनी काळजावर मोठा दगड ठेवून पंढरपूरला येण्याचे टाळले. प्रशासनाने घालून दिलेले नियम तंतोतंत पाळणे, हा हिंदूंचा मोठेपणाच आहे.
याउलट यंदाच्या रमझान ईदच्या निमित्ताने धाराशिव आणि लातूर जिल्हा, तसेच सोलापूर शहर यांठिकाणी कोरोनाच्या कठोर निर्बंधांमध्ये प्रशासनाने शिथिलता दिली. कोरोनाच्या दुसर्या लाटेत दळणवळण बंदी असतांनाही अनेक युवकांचेही मृत्यू होत आहेत. केवळ अल्पसंख्यांकांच्या तुष्टीकरणासाठी प्रशासनाने नियमांमध्ये शिथिलता देणे, हे अतिशय गंभीर आणि दुर्दैवी आहे. यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढून पुढे गंभीर परिणाम झाल्यास त्याचे दायित्व कोण घेणार ? भारतात प्रशासकीय व्यवस्था ‘निधर्मी’ केवळ नावापुरतीच आहे, हाच संदेश यातून दिला जात आहे. आजपर्यंत अनेक प्रसंगांमध्ये मुसलमानांचे लांगूलचालन झालेलेच आहे; परंतु कोरोनाच्या समस्येपुढे तरी प्रशासन दुजाभाव करणार नाही, असे म्हणणे चुकीचे ठरेल.
निर्बंध शिथिल केल्यामुळे या कालावधीमध्ये सामाजिक अंतर न पाळणे, गर्दी करणे हे सर्व आलेच. कोरोनाचा विषाणू दुजाभाव करत नाही. नियम मोडणार्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची अनेक उदाहरणे पाहिलीही आहेत. ‘कुंभमेळ्यामुळे कोरोना पसरला’, असे म्हणणारे आता ‘रमझानमुळे कोरोनाचा संसर्ग वाढला’, तर ते तसे म्हणणार का ? हिंदूंना ‘लक्ष्य’ करणारे निधर्मी अल्पसंख्याकांना ‘टार्गेट’ करणार नाहीत, हेही तितकेच खरे ! प्रशासन अशा प्रकारचा दुजाभाव करून काय साध्य करत आहे ? बहुसंख्य हिंदूंना नेहमीच अशा प्रकारची वागणूक दिली जाते. यातून समान नागरी कायद्याची आवश्यकता अधोरेखित होते. अशा प्रकारच्या लांगूलचालनातून पुढे धर्मांधांनी कायदा हातात घेतल्यास त्याविषयी आश्चर्य वाटायला नको. आता तरी प्रशासनाने अंतर्मुख होऊन लोककल्याणासाठी योग्य भूमिका घेण्यासाठी प्रयत्न करणे अपेक्षित आहे.
– वर्षा कुलकर्णी, सोलापूर