श्रीक्षेत्र पिंगुळी (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील थोर संत प.पू. सद्गुरु समर्थ विनायक (अण्णा) राऊळ महाराज यांचा देहत्याग

कुडाळ (जिल्हा सिंधुदुर्ग) – पिंगुळी येथील थोर संत प.पू. सद्गुरु समर्थ राऊळ महाराज यांचे उत्तराधिकारी तथा येथील मठाचे मठाधिपती प.पू. सद्गुरु समर्थ विनायक (अण्णा) राऊळ महाराज (वय ७६ वर्षे) यांनी १५ मे २०२१ ला रात्री देहत्याग केला. १६ मे या दिवशी सकाळी ९ वाजून ११ मिनिटांनी त्यांच्या इच्छेनुसार येथील प.पू. राऊळ महाराज समाधी मंदिर परिसरात त्यांना समाधीस्त करण्यात आले. त्यांच्या पश्‍चात पत्नी पू. (श्रीमती) संगीता उपाख्य पू. बाईमा, ३ मुले, २ मुली, ३ भाऊ, सुना, जावई, नातवंडे, असा परिवार आहे.

प.पू. सद्गुरु समर्थ विनायक (अण्णा) राऊळ महाराज यांनी समाजाला धार्मिक, आध्यात्मिक शिकवण देण्यासह सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, शिक्षण, स्वच्छता आदी क्षेत्रांतही मोठे कार्य केले आहे. आपल्या गुरूंचा वारसा तेवढ्याच क्षमतेने पुढे नेऊन त्यांचे कार्य सातासमुद्रापार पोचवणारे प.पू. सद्गुरु समर्थ विनायक (अण्णा) राऊळ महाराज ‘प.पू. अण्णा महाराज’ या नावाने सुपरिचित होते.

सिंधुदुर्ग जिल्ह्यासह महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, गुजरात या राज्यांसह विदेशातही त्यांचे भक्त मोठ्या प्रमाणात आहेत. आपल्या भक्तांवर मायेची पाखर घालणारे प.पू. विनायक (अण्णा) राऊळ महाराज यांनी देहत्याग केल्याचे समजताच त्यांच्या भक्तांना अश्रू अनावर झाले. ‘प.पू. विनायक (अण्णा) राऊळ महाराजांच्या देहत्यागाने आम्ही त्यांच्या मायेला आणि कृपाछत्राला पोरके झालो’, अशा भावना अनेकांनी व्यक्त केल्या.

प.पू. सद्गुरु समर्थ विनायक (अण्णा) राऊळ महाराज यांची प.पू. भक्तराज महाराज यांच्यावर असलेली श्रद्धा !

प.पू. सद्गुरु समर्थ विनायक (अण्णा) राऊळ महाराज यांना एकदा भेटायला गेलो होतो. मला ते ‘सनातनवाला’ म्हणून हाक मारायचे. मला हाक मारून त्यांनी जवळ बोलावून घेतले. सनातनच्या कार्याविषयी थोडे बोलल्यावर त्यांनी मला त्यांच्या गळ्यातील एक माळ काढून दाखवली आणि म्हणाले, ‘‘एकदा प.पू. भक्तराज महाराज (सनातनचे श्रद्धास्थान) कुडाळ येथे आले होते. त्यांना भेटायची मला पुष्कळ इच्छा होती; पण भेटता आले नाही. असे असले, तरी त्यांनी आशीर्वादरूपी माळ माझ्यासाठी पाठवून दिली. ती माळ मी कायम गळ्यात घालून असतो.’’

– श्री. संजय जोशी, पिंगुळी, कुडाळ. (१६.५.२०२१)

समाजाच्या कल्याणासाठी अहोरात्र झटणारे आणि सनातनवर भरभरून प्रेम करणारे प.पू. विनायक (अण्णा) राऊळ महाराज यांच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता !

‘सिंधुदुर्ग जिल्ह्यात सनातनच्या कार्याचा आरंभ करण्यासाठी आणि ते कार्य पुढे अधिक गतीने वाढण्यासाठी ज्या ज्या संतांचे आशीर्वाद लाभले, त्यातील प.पू. विनायक (अण्णा) राऊळ महाराज यांचे नाव प्राधान्याने घ्यावे लागेल. त्यांनी सनातनच्या राष्ट्र आणि धर्म जागृतीच्या कार्याला आशीर्वाद देण्यासह या कार्याला सर्वतोपरी साहाय्य केले, तसेच त्यांनी त्यांच्या असंख्य भक्तांसह सनातनच्या साधकांवर भरभरून प्रेम केले. साधकांना होणार्‍या वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ वेळोवेळी नामजपादी उपाय करून त्यांनी साधकांचे रक्षण केले. त्यामुळे त्यांचा आम्हाला मोठा आधार वाटत असे. सनातनचा गुरुपौर्णिमा उत्सव असो वा हिंदु राष्ट्रजागृती सभा प.पू. राऊळ महाराजांनी सनातनच्या अनेक उपक्रमांना शुभेच्छारूपी संदेश देऊन, तसेच प्रत्यक्ष उपस्थित राहून आशीर्वाद देऊन मार्गदर्शन केले. त्यांच्यासारख्या संतांच्या आशीर्वादामुळेच सनातनचे राष्ट्र आणि धर्म जागृतीचे कार्य आज सर्वत्र अव्याहतपणे चालू आहे. प.पू. अण्णा राऊळ महाराज हे त्यांचे गुरु समर्थ सद्गुरु प.पू. राऊळ महाराज यांच्याशी सर्वार्थाने एकरूप झालेले होते. ‘आदर्श शिष्य कसा असावा’, हे त्यांनी त्यांच्या कृतीतून समाजाला दाखवून दिले. प.पू. अण्णा राऊळ महाराज आज स्थूलदेहाने जरी आपल्यात नसले, तरी त्यांचे सूक्ष्मातील दैवी कार्य अखंड चालूच रहाणार आहे. त्यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार सर्व भक्तांनी साधना करणे आणि त्यांनी सांगितलेल्या भक्तीमार्गानुसार मार्गक्रमण करणे, हीच खरी त्यांना श्रद्धांजली ठरेल. भक्तांसह समाजाच्या कल्याणासाठी अहोरात्र झटणारे आणि सनातनवर भरभरून प्रेम करणारे प.पू. विनायक (अण्णा) राऊळ महाराज यांच्या चरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे. त्यांची कृपा सदैव सर्व भक्तांवर आणि सनातनच्या साधकांवर राहो, हीच त्यांच्या चरणी प्रार्थना !’

– (परात्पर गुरु) डॉ. जयंत आठवले, संस्थापक, सनातन संस्था.