मुंबई – धैर्यवान लोक कायम प्रयत्न चालूच ठेवतात. आपल्यालाही तसेच करायचे आहे. संपूर्ण भारताला एक समाज म्हणून सर्व भेदभाव विसरून, गुणदोषांच्या चर्चांमध्ये न अडकता एकसंघ बनून काम करावे लागणार आहे. कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी अंतर्गत भेदभाव विसरून सामूहिक प्रयत्न आवश्यक आहेत, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवी देहली येथील ‘कोविड रिस्पॉन्स टीम’च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘आम्ही जिंकणार’ या व्याख्यानमालेत १५ मे या दिवशी ‘ऑनलाईन’ मार्गदर्शनात त्यांनी वरील आवाहन केले.
( सौजन्य: The Economic Times )
या वेळी मोहन भागवत म्हणाले,
१. कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर आपण बेसावध राहिल्याने आजचे संकट उभे राहिले. आता कोरोनाच्या तिसर्या लाटेची चर्चा चालू झाली आहे; पण न घाबरता या लाटेला परतवून लावण्याची सिद्धता करायला हवी.
२. ‘एखादी गोष्ट नवीन किंवा जुनी आहे, म्हणून योग्य’, असे ठरवू नये. कोणतीही चर्चा ही वैज्ञानिकतेच्या आधारावरच पडताळून घेतली गेली पाहिजे. आपल्याकडून कोणतीही निराधार गोष्ट समाजात जाऊ नये, याची काळजी घ्यायला हवी.
३. आयुर्वेदाच्या नावावर अनेक चर्चा चालू असतात; पण वैज्ञानिक तर्कावर जोपर्यंत त्या गोष्टी सिद्ध होत नाहीत, तोपर्यंत त्याविषयी सावध रहावे.
४. काही लोक घाबरून रुग्णालयात भरती होतात. परिणामी आवश्यकता असलेल्या रुग्णाला खाट मिळत नाही. त्यामुळे लक्षणे जाणवू लागताच डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार चालू करा.
५. नियमांचे पालन करून समाजसेवा केली, तर आपण पुढे जाऊ. ही आपल्या धैर्याची परीक्षा आहे. सतत लढत रहाण्याचे धारिष्ट्य महत्त्वाचे आहे. यश-अपयशाचा खेळ चालतच रहाणार आहे. त्यामुळे निराश न होता प्रयत्नरत रहा.