जात पंचायतीवर विश्वास नसल्याने महिलेने न्यायालयाची पायरी चढून निकाल प्राप्त केला. त्यामुळे जात पंचायतीने महिलेला विकृत शिक्षा देण्याऐवजी स्वतःच्या कार्यप्रणालीत सुधारणा करावी, तसेच असा विकृत प्रकार करणार्यांवर पोलिसांनी कठोर कारवाई करावी !
अकोला – जिल्ह्यातील वडगाव येथील जात पंचायतीने महिलेला थुंकी चाटण्याची शिक्षा दिल्याप्रकरणी १० पंचांवर जळगाव जिल्ह्यातील चोपडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी हे प्रकरण अन्वेषणासाठी अकोला जिल्ह्यातील पिंजर पोलिसांकडे वर्ग केले आहे. जात पंचायतीमधील एकनाथ शिंदे, प्रेमनाथ शिंदे, गणेश बाबर, शिवनाथ शिंदे, किसन सावंत, दिनेश चव्हाण, काशिनाथ बाबर, कैलास शिंदे, कैलास सावंत, संतोष शेगर अशी गुन्हा नोंद केलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्हे यांनी राज्याच्या गृहमंत्र्यांना पत्र लिहून या प्रकरणी कठोर कारवाई करण्याची विनंती केली आहे.
काय आहे प्रकरण ?
पीडित महिलेने साईनाथ बाबर यांच्याशी वर्ष २०११ मध्ये विवाह केला; मात्र पतीच्या जाचाला कंटाळून तिने वर्ष २०१५ मध्ये न्यायालयातून घटस्फोट घेतला. तिने न्यायालयात जाणे तिच्या नाथजोगी जात पंचायतीमधील पंचांना मान्य नव्हते. त्यांनी हा घटस्फोट धुडकावून लावला. पीडित महिलेने वर्ष २०१९ मध्ये अनिल बोडखे या घटस्फोटित व्यक्तीशी केलेला पुनर्विवाह जात पंचायतीने अमान्य केला आणि पंचांनी तिला १ लाख रुपयांचा दंड ठोठावला. महाराष्ट्रातील पंचांनी एकत्र येऊन न्यायनिवाडा करत मद्य आणि मटणाची मेजवानी केली, तसेच त्या कुटुंबास जातीतून बहिष्कृत केले. ‘पीडित महिलेने पहिल्या पतीसमवेत रहावे’, असा हेका पंचांनी कायम ठेवला. तसेच पंचांनी ‘केळीच्या पानावर थुंकायचे आणि त्या महिलेने ते चाटायचे’ अशी शिक्षा महिलेला देऊन विकृतीचे दर्शन घडवले.