पुणे येथील मृत्यू पावलेल्या खातेधारकाचे पैसे बँक अधिकार्‍यांनीच काढले !

घोटाळेबाजांना कठोर शिक्षा न दिल्यानेच त्यांचे फावते. त्यामुळे खासगी असो वा शासकीय क्षेत्र असो, भ्रष्टाचार करणार्‍यांना कठोर शिक्षा होते, हा पायंडा पडला तरच अशा प्रकारांना आळा बसू शकेल !

पुणे – आजारी आणि ज्येष्ठ नागरिकांना घरपोच बँकिग सेवा देतांना इंडसइंड बँकेतील महिला रिलेशनशिप मॅनेजर आणि व्यवस्थापकाने खातेधारकाच्या बँक खात्यातून बनावट स्वाक्षरीद्वारे परस्पर पैसे काढून अपहार केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी विमानतळ पोलिसांनी जुबेर गांधी आणि अंकिता रंजन या बँकेच्या मॅनेजरसह महिला अधिकार्‍याला ३ मे या दिवशी अटक केली आहे.

या प्रकरणी चंद्रशेखर राजगोपालन यांनी त्यांच्या वडिलांच्या मृत्यूनंतर २४ मार्च या दिवशी त्यांच्या खात्यातून २ लाख ३७ सहस्र रुपये कोणीतरी काढून घेतल्याचे दिसून आल्यानंतर विमानतळ पोलिसांकडे तक्रार दिली आहे.

याविषयी वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार यांनी सांगितले की, ही अफरातफर केल्यानंतर जुबेर गांधी यांचे लष्कर येथील शाखेत स्थानांतर झाले होते. तर अंकिता रंजन या दुसरीकडे नोकरी करत आहेत. दोघांना अटक करण्यात आली असून ६ मेपर्यंत न्यायालयाने त्यांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे. या २ अधिकार्‍यांनी अशा प्रकारे आणखी काही खातेधारकांची फसवणूक केली असल्याची शक्यता आहे. त्यांनी विमानतळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. (कर्मचारी घोटाळे करत असतांना वरिष्ठ अधिकार्‍यांच्या लक्षात कसे येत नाही ? प्रतिमास अधिकोषांचे ताळेबंद सिद्ध करतांना हा भ्रष्टाचार उजेडात कसा आला नाही ? – संपादक)