सांगली – ३ मे या दिवशी सांगली जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या १ सहस्र ५६८ वर पोचली आहे. यात ४० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ही अतिशय गंभीर गोष्ट असून ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी दळणवळण बंदी हा एकमेव पर्याय आहे. त्यामुळे प्रशासनाशी चर्चा करून ५ मेच्या मध्यरात्रीपासून सांगली जिल्ह्यात संपूर्ण दळणवळण बंदी घोषित करण्यात येत आहे. ही बंदी पुढील ८ दिवस असणार आहे, अशी माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिली आहे.
काल सांगली जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या १५६८ वर पोहोचली तर ४० रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला, ही बाब अतिशय गंभीर आहे. परिस्थिती आटोक्यात आणायची असेल, तर लॉकडाऊन हा एकमेव पर्याय आहे. त्यामुळे प्रशासनाशी चर्चा करून सांगली जिल्ह्यात संपूर्ण लॉकडाऊनचा निर्णय आम्ही घेत आहोत. pic.twitter.com/RSfMapbdD6
— Jayant Patil (@Jayant_R_Patil) May 4, 2021
जयंत पाटील पुढे म्हणाले, कोरोनाच्या उद्रेकामुळे बारामती आणि सातारा जिल्ह्यात दळणवळण बंदी घोषित करण्यात आली असून सांगली जिल्ह्यातही दळणवळण बंदी घोषित करण्यात येत आहे. सध्या आपल्याला ऑक्सिजन मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणात शक्ती व्यय होत आहे. औषधांविषयीही प्रश्न निर्माण होत आहेत. जीवनावश्यक वस्तूंपेक्षा आपल्या सर्वांचे जीवन महत्त्वाचे आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्यातील नागरिकांनी दळणवळण बंदी यशस्वी होण्यासाठी सहकार्य करावे.