गोकुळच्या निवडणुकीत ९९.७८ टक्के मतदान : आज मतमोजणी

मतदानाच्या कालावधीत कोरोनाविषयक नियमांची पूर्णत: पायमल्ली


कोल्हापूर, ३ मे – जिल्हा दूध उत्पादन संघाच्या (गोकुळ) निवडणुकीसाठी २ मे या दिवशी जिल्ह्यातील ७० मतदान केंद्रांवर अत्यंत चुरशीने ९९.७८ टक्के मतदान झाले. एकूण ३ सहस्र ६५० मतदारांपैकी ३ सहस्र ६३९ मतदारांनी त्यांचा हक्क बजावला. या मतदानाच्या कालावधीत कोरोनाविषयक नियम पूर्णत: पायदळी तुडवत सामाजिक अंतराचा पूर्णत: फज्जा उडाल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे हे सर्व पोलिसांसमोर होत असून पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली. ४ मे या दिवशी मतमोजणी होत आहे.

(पोलिसांसमोरच जर सामाजिक अंतराच्या नियमांचे उल्लंघन होऊनही पोलीस बघ्याची भूमिका घेत असतील, तर अशा पोलिसांकडून कायदा-सुव्यवस्था राखण्याचे कर्तव्य पार पडेल काय ? पोलिसांनी राजकीय कायकर्त्यांची भूमिका पार न पाडता नियमांचा भंग होतांना कठोर कारवाई करणे अपेक्षित आहे. कोरोनाची भयावहता लक्षात न घेता नियमांचे उल्लंघन करणारे राजकीय पक्षाचे लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते स्वत: समवेत सामान्य जनतेचाही जीव धोक्यात घालत आहेत. पोलिसांकडून जर कारवाई होत नसेल, तर वेळप्रसंगी जिल्ह्याचे प्रमुख या नात्याने जिल्हाधिकार्‍यांनी या सर्वांवर कारवाईचे आदेश द्यावेत ! – संपादक)

१. मतदानाच्या कालावधीत सत्तारूढ आणि विरोधी पक्षातील नेते, कार्यकर्ते हे मोठ्या संख्येने शक्तीप्रदर्शन करत मतदानासाठी उपस्थित रहात होते. मतदान करण्यासाठी येणारे मतदार घोळक्याने एकत्र येऊन मतदान केंद्राच्या बाहेर थांबत होते.

२. प्रत्येक मतदान केंद्रावर, तसेच शहरात मोठा पोलीस बंदोबस्त होता; मात्र घोळक्याने एकत्र येणार्‍या मतदारांना पोलिसांनी कुठेही अटकाव केला नाही. पोलिसांनी काही ठिकाणी केवळ ध्वनीक्षेपकावरून सूचना देण्याचे काम केले.

३. प्रत्येक सामान्य माणसाने सामाजिक अंतराचे नियम मोडल्यावर कारवाईचा बडगा उगारणारे पोलीस या ठिकाणी मात्र त्यांच्या समोर नियम मोडत असतांना केवळ बघ्याची भूमिका घेत होते.

विजयी मिरवणुका काढण्यास बंदी; प्रसंगी संबंधितांवर गुन्हे नोंद करू ! – पोलीस अधीक्षक

कोल्हापूर – ४ मे या दिवशी कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ अर्थात् गोकुळच्या मतमोजणीनंतर शहरासह जिल्ह्यात कुठेही विजयी मिरवणुका काढण्यास उमेदवार आणि कार्यकर्ते यांना बंदी घालण्यात आली आहे. मतमोजणी केंद्राजवळ कुणीही गर्दी करू नये. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर याचे काटेकोरपणे पालन करावे अन्यथा संबंधितांवर गुन्हे नोंद करू, अशी चेतावणी पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी ३ मे या दिवशी दिली आहे.