श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी सांगितलेली अमृतवचने

श्रीचित्‌शक्‍ति सौ. अंजली गाडगीळ

१. साधकांनी कंटाळा न करता सतत आध्यात्मिक स्तरावर कठोर साधना केली, तर साधकांच्या जीवनरक्षणासाठी व्यय होणारी संतांची आणि परात्पर गुरुदेवांची शक्ती राष्ट्ररक्षणासाठी वापरली जाऊन ‘ईश्‍वरी राज्य’ लवकर येईल ! : ‘साधकांना आनंदाने साधना करता यावी; म्हणून आपले गुरु सर्व साधकांचे कष्ट स्वतःवर घेतात. ते साधकांचे त्रास स्वतः भोगतात. आपण साधनेचे नित्य प्रयत्न तळमळीने केले, तर आपल्या रक्षणासाठी गुरूंची शक्ती व्यय होत नाही. आपण साधना केली नाही, तर आपल्या गुरूंना आपले त्रास भोगावे लागतात. गुरु साधकांचे त्रास निःस्वार्थीपणे भोगतात.

​परात्पर गुरु डॉ. आठवले यांचेही तसेच आहे. त्यांचा देह आता त्यांचा राहिला नसून तो समष्टीचा झाला आहे. आपल्याला आध्यात्मिक त्रास होऊ लागला, तर अनेक संत आपल्या जीवनरक्षणासाठी जपाला बसतात. आपणच गांभीर्याने साधना केली, तर आपण संतांचा अमूल्य वेळ वाचवू शकतो. आपल्या जीवनरक्षणासाठी व्यय होणारी संतांची आणि परात्पर गुरुदेवांची शक्ती राष्ट्ररक्षणासाठी वापरली गेली, तर ‘ईश्‍वरी राज्य’ लवकर येणार नाही का ? त्यासाठी आपले साधनेचे योगदान हवे. आपण कंटाळा न करता सतत आध्यात्मिक स्तरावर कठोर साधना करून कार्यरत राहिले पाहिजे, तरच ‘ईश्‍वरी राज्य’ लवकर येऊ शकते. याला सर्वस्वी उत्तरदायी आपणच आहे. याचा प्रत्येकाने गांभीर्याने विचार केला पाहिजे.

२. ‘ईश्‍वरी राज्य’ येणे’, हे सर्वस्वी साधकांवरच अवलंबून असल्याने त्यासाठी संख्याबळापेक्षा प्रल्हादासारखा भक्त बनण्याची आवश्यकता आहे ! : ‘ईश्‍वरी राज्य’ कधी येणार ?’, असा प्रश्‍न कुणीच कुणाला विचारू नये. हे सर्वस्वी आपल्यावरच अवलंबून आहे. प्रल्हादासाठी नरसिंहाने अवतार घेऊन हिरण्यकश्यपूचा वध केला. तो प्रल्हाद बनण्यासाठी आता आपण धडपडले पाहिजे. ईश्‍वराला वाटले पाहिजे, ‘खरंच, आता या एका भक्ताच्या मागणीसाठी तरी आपल्याला पृथ्वीवर गेले पाहिजे.’ ‘ईश्‍वरी राज्य’ येण्यासाठी संख्याबळाची आवश्यकता नाही, तर प्रल्हादासारखा भक्त बनण्याची आवश्यकता आहे. चला तर साधनेचे प्रयत्न करून भगवंताच्या कृपाप्रसादाला प्राप्त होऊया !