भरूच (गुजरात) येथील कोविड सेंटरला लागलेल्या भीषण आगीत १६ जणांचा मृत्यू !

अनेक जण घायाळ

भारतात कोविड सेंटरला आग लागण्याच्या घटना वाढत असतांना त्या रोखण्यासाठी सरकारी यंत्रणा देश पातळीवर काय प्रयत्न करणार ?

कर्णावती (गुजरात) – गुजरातच्या भरूच येथील एका कोविड सेंटरला लागलेल्या आगीमध्ये १६ जणांचा होरपळून मृत्यू झाला, तर अनेक जण गंभीररित्या घायाळ झाले आहेत. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. येथील पटेल वेलफेअर रुग्णालयात असलेल्या या कोविड सेंटरला रात्री साडेबाराच्या सुमारास ही आग लागली. या सेंटरमधील अतीदक्षता विभागामध्ये शॉटसर्किट झाल्याने ही आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. यात हा संपूर्ण विभाग जळून खाक झाला. यापूर्वी नाशिकमधील एका रुग्णालयात ऑक्सिजनच्या टाकीचा पाईप फुटून झालेल्या गळतीमुळे २४ रुग्णांना प्राण गमवावे लागले होते. या घटनेनंतर विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयातील कोविड सेंटरला भीषण आग लागली होती. या आगीत १३ जणांचा होरपळून मृत्यू झाला होता, तर काही रुग्ण गंभीररित्या घायाळ झाले होते.