गोव्यात एकूण ३ लाख २० सहस्र लसीकरण

पणजी – गोव्यात कोरोनावर एकूण ३ लाख २० सहस्र लसिंचे डोस देण्यात आले आहेत. यांपैकी २ लाख ५२ सहस्र १४३ जणांना पहिला डोस, तर ६८ सहस्र ५३७ जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे. दिवसभरात गोव्यात ५ सहस्र ३५७ जणांचे लसीकरण करण्यात आले. यांपैकी ४ सहस्र ११३ जणांना पहिला डोस, तर १ सहस्र २४४ जणांना दुसरा डोस देण्यात आला.

कोरोनांतर्गत वैद्यकीय उपचारासाठी ‘डी.डी.एस्.एस्.वाय्.’ योजनेअंतर्गत विम्याचे संरक्षण मिळणार

पणजी – कोरोनासाठी खासगी रुग्णालयांमध्ये केलेल्या वैद्यकीय उपचाराला ‘दिन दयाळ स्वास्थ्य सेवा योजने’अंतर्गत (डी.डी.एस्.एस्.वाय्.) विम्याचे संरक्षण मिळणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली. मुख्यमंत्री पुढे म्हणाले, ‘‘खासगी रुग्णालयात उपचार घेणार्‍या कोरोनाबाधित रुग्णांचा सुमारे ७० ते ८० टक्के खर्च ‘डी.डी.एस्.एस्.वाय्.’ योजनेअंतर्गत केला जाणार आहे. यासंबंधी अधिसूचना लवकरच प्रसिद्ध केली जाणार आहे.’’

सध्या खासगी रुग्णालयात सर्वसाधारण विभागात असलेल्या रुग्णांसाठी प्रतिदिन अधिकाधिक ८ सहस्र रुपये घेता येतील, तर अतिदक्षता विभागात असलेल्या रुग्णासाठी अधिकाधिक १९ सहस्र २०० रुपये प्रतिदिन घेता येतील, अशी मर्यादा शासनाकडून घालण्यात आली आहे.

नागरिकांनी आवश्यक दक्षता घेणे आवश्यक 

कोरोनचा संसर्ग होऊ नये, यासाठी नागरिकांनी आवश्यक दक्षता घेतली पाहिजे. कोरोनाची लक्षणे जाणवू लागल्यास त्वरित औषधोपचाराला प्रारंभ केला पाहिजे. कोरोनाच्या चाचणीसाठी गेलेल्यांना त्या ठिकाणीच औषधे पुरवली जात आहेत. यानुसार कोरोनाच्या उपचाराच्या नियमामध्ये पालट केलेले आहेत.