कोरोना : जनतेच्या ससेहोलपटीला कारणीभूत कोण ?

‘अशा आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी भगवंताचे भक्त बना आणि साधना वाढवा. अन्य कुणीही नाही, तर भगवंतच वाचवील !’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

वणी (यवतमाळ) येथील कोरोना रुग्णांचे पडताळणी अहवाल १० दिवसांनंतरही मिळाले नाहीत !

वणी (यवतमाळ), २८ एप्रिल (वार्ता.) – येथील अनेक कोरोना संशयित रुग्णांचे पडताळणी अहवाल १० दिवस होऊनही मिळालेले नाहीत. सध्या तालुक्यात प्रतिदिन ७० पेक्षा अधिक कोरोना रुग्ण आढळत आहेत. अहवाल वेळेत न मिळाल्यास या संशयितांकडून मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रसार झाला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


वणी येथे सीटीस्कॅन यंत्राच्या अभावी तालुक्यातील रुग्णांची जिल्ह्याच्या ठिकाणी पायपीट !

वणी (यवतमाळ), २८ एप्रिल (वार्ता.) – कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे येथे फुफ्फुसाच्या पडताळणीसाठी ‘सीटीस्कॅन’ यंत्राची आवश्यकता आहे; मात्र वणीमध्ये सध्या खासगी रुग्णालयातील हे यंत्र बंद पडले आहे. त्यामुळे तालुक्यातील रुग्णांना जिल्ह्याच्या ठिकाणी जावे लागत आहे. चंद्रपूर, यवतमाळ आणि नागपूर येथे उपचारासाठी जाणे सामान्य रुग्णांना परवडत नाही.


‘ऑक्सिजन बेड’ न मिळाल्यामुळे सातारा येथे रुग्णालयाच्या दारात महिलेचा मृत्यू 

प्रतिकात्मक छायाचित्र

सातारा, २८ एप्रिल (वार्ता.) – ‘ऑक्सिजन बेड’ उपलब्ध न होऊ शकल्यामुळे वाई येथील एका ५७ वर्षीय महिलेचा जम्बो कोविड रुग्णालयाच्या दारातच मृत्यू झाला. या महिलेच्या मुलांनी ६ घंटे बेड मिळवण्यासाठी अथक परिश्रम केले; मात्र त्यांना कुठेही बेड उपलब्ध होऊ शकला नाही.

सातारा जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आरोग्ययंत्रणा कोलमडून पडली आहे. बेड आणि ऑक्सिजन मिळत नसल्याने अनेक रुग्णांना आपला जीव गमवावा लागत आहे. प्रशासनाच्या अनास्थेमुळेच रुग्णाचा जीव गेला असून रुग्णालयात केवळ वशिल्यानेच रुग्ण घेतले जात असल्याचा आरोप महिलेच्या नातेवाइकांनी केला आहे.

रुग्णांची संख्या आवाक्याबाहेर जात असल्याने नियोजनाच्या अभावामुळे रुग्णालयाचे दुर्लक्ष !

सकाळी ११ वाजल्यापासून ४ वाजेपर्यंत महिला रुग्ण रुग्णालयाच्या बाहेर ‘अ‍ॅब्युलन्स’मध्ये बसून होती. तिची मुले अन् नातेवाईक रुग्णाला भरती करून घेण्यासाठी गयावया करत होते; मात्र कुणीही आले नाही. रुग्ण दगावल्यानंतर रुग्णालयातील आधुनिक वैद्यांना सांगितल्यानंतर ते आले आणि त्यांनी रुग्णाचा ईसीजी काढून रुग्णालयात भरती करण्याचे आश्‍वासन देऊ लागले, त्या वेळी मृत महिलेचे नातेवाईक अधिकच संतप्त झाले.


संभाजीनगर येथे रेमडेसिविरचा खुलेआम काळाबाजार चालूच !

५० सहस्र रुपयांत दलालांकडून २ रेमडेसिविर इंजेक्शनची विक्री !

निद्रिस्त पोलीस आणि प्रशासन !

संभाजीनगर – एकीकडे शेकडो रुग्णांचे नातेवाईक रेमडेसिविर इंजेक्शन मिळवण्यासाठी भटकत आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात खासगी रुग्णालयांचे प्रतिनिधी खेटे घालत आहेत. दुसरीकडे मात्र शहरात या इंजेक्शनचा खुलेआम काळाबाजार चालू आहे. २६ एप्रिल या दिवशी सायंकाळी ४.३० वाजता येवला (जिल्हा नाशिक) येथून आलेल्या एका तरुणाने शिवाजीनगरजवळील चौकात २ दलालांना ५० सहस्र रुपये देऊन त्यांच्याकडून रेमडेसिविरचे २ इंजेक्शन घेतले. (शहरात रेमडेसिविर इंजेक्शनची खुलेआम विक्री होत असतांना पोलीस आणि प्रशासन यांना हे कळत कसे नाही ? सर्व यंत्रणा हाताशी असणार्‍या प्रशासनाने हे थांबवणे अपेक्षित आहे ! – संपादक)

या तरुणाचे नातेवाईक कोरोनावर उपचार घेत आहेत. २६ एप्रिल या दिवशी त्याला आधुनिक वैद्यांनी तात्काळ रेमडेसिविर इंजेक्शन आणण्यास सांगितले; मात्र येवला येथे पुष्कळ शोधाशोध करूनही ते मिळाले नाही; पण तेथील एक औषधी विक्रेत्या दुकानदाराने त्यांना संभाजीनगर येथे काही दलाल निश्‍चितपणे रेमडेसिविर देतील; पण त्यासाठी थोडे अधिक पैसे मोजावे लागतील, असे सांगितले. दुकानदाराने दलालांचा भ्रमणभाष क्रमांक त्या तरुणाला दिला. (यावरून या औषध विक्रेत्यांचेही त्या दलालाशी संबंध असून रेमडेसिविर इंजेक्शन विक्री करायची ही मोठी साखळी असल्याचे दिसून येते. त्यामुळे पोलीस आणि प्रशासन यांनी अशा औषध दुकानदारांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करायला हवी ! – संपादक) त्यावर त्याने दलालांशी संपर्क साधला, तेव्हा त्या दलालांनी ‘काही काळजी करू नका. २ इंजेक्शन नक्की मिळतील,’ असे उत्तर दिले, तसेच शहरातील गजबजलेल्या शिवाजीनगरजवळील चौकात येऊन त्या तरुणाला बिनधास्तपणे २ इंजेक्शन देऊन निघून गेले.

कोरोनाच्या काळात आलेले कटू अनुभव त्वरित कळवा !

आपणासही अशा प्रकारचे कटू अनुभव आले असल्यास आरोग्य साहाय्य समितीस पुढील पत्त्यावर त्वरित कळवा. समाजाच्या प्रबोधनासाठी असे अनुभव त्वरित लिखित स्वरूपात कळवणे, ही काळानुसार समष्टी साधना आहे, हे लक्षात घेऊन येणारे कटू किंवा चांगले अनुभव त्वरित पाठवावेत.

आरोग्य साहाय्य समिती

पत्ता : सौ. भाग्यश्री सावंत, आरोग्य साहाय्य समिती, ‘मधु स्मृती’, सत्यनारायण मंदिराच्या शेजारी, फोंडा, गोवा. ४०३ ४०१.  संपर्क क्रमांक : ७०५८८८५६१०

ई-मेल पत्ता : [email protected]