कोरोनाविषयक चाचणी झालेल्या रुग्णांचा अहवाल येण्याआधीच औषधोपचार चालू केले जातील !  विश्‍वजित राणे, आरोग्यमंत्री

विश्‍वजित राणे,

पणजी, २७ एप्रिल (वार्ता.) –  कोरोनाची लक्षणे असलेल्या रुग्णांची चाचणी केल्यावर त्याविषयीचा अहवाल येण्याआधीच त्यांच्यावर औषधोपचार करण्यात येतील, अशी माहिती आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी २७ एप्रिलला पत्रकारांना दिली.

ते म्हणाले, ‘‘संसर्ग झालेल्यांपैकी मृत्यू झालेल्या लोकांचा अभ्यास केल्यानंतर अनेक जण आजार वाढल्यावर विलंबाने रुग्णालयात भरती झाल्याचे दिसून आले आहे. यामुळे आरोग्य खात्याने कार्यपद्धतीमध्ये पालट केला असून जेे रुग्ण चाचणीसाठी येतात, त्यांचा अहवाल येण्याची वाट न पहाता त्यांच्यावर उपचार केले जातील. सध्या चाचणीसाठी लागणारी सुविधा आवश्यक तेवढी उपलब्ध नसल्याने कोरोनाविषयक नमुन्यांची चाचणी करण्यासाठी विलंब होत होता; परंतु आता साधनसुविधा वाढवल्यानंतर ती उणीव भरून काढली आहे.’’

आरोग्य खात्याचे संचालक डॉ. जोस डिसा म्हणाले की, रुग्णांवर आधीच औषधोपचार केल्याने गंभीर स्थितीत रुग्णालयात भरती होणार्‍या रुग्णांचे प्रमाण अल्प होईल. गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता (डिन) डॉ. शिवानंद बांदेकर म्हणाले की, तज्ञ डॉक्टरांशी चर्चा करून कार्यपद्धतीमध्ये पालट करण्यात आला आहे. इतर राज्यांतही हीच कार्यपद्धत अवलंबली जात आहे. दुसरे म्हणजे प्रवास करणार्‍यांनी आरोग्य खात्याकडून प्रमाणपत्र न घेता, त्यांनी ते खासगी रुग्णालयांतून घ्यावे. यामुळे शासकीय यंत्रणेवरील भार अल्प होईल.’’ (खासगी रुग्णालयांनी यासाठी अव्वाच्या सव्वा शुल्क आकारल्यास गरिबांनी काय करायचे ? ते सरकारी आरोग्ययंत्रणेवरच अवलंबून असतात, हे आरोग्य खात्याने लक्षात घ्यावे ! – संपादक)

गोवा वैद्यकीय महाविद्यालयात १ कोटी लिटर ऑक्सिजनची आवश्यकता !  डॉ. शिवानंद बांदेकर

पणजी  सध्या कोरोनाच्या वाढत्या प्रमाणामुळे गोवा वैद्यकीय महाविद्यालयात प्रतिदिन १ कोटी लिटर ऑक्सिजनची आवश्यकता भासत असल्याची माहिती गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता (डिन) डॉ. शिवानंद बांदेकर यांनी दिली. ते म्हणाले, ‘‘सध्याची राज्यातील कोरोनाची स्थिती लक्षात घेता पुढील काही दिवसांत रुग्णालयाला प्रतिदिन ३ कोटी लिटर ऑक्सिजनची आवश्यकता भासू शकते. गोवा वैद्यकीय महाविद्यालयात भरती करण्यात आलेल्या ३९३ रुग्णांपैकी ३३२ जणांना ऑक्सिजन द्यावा लागतो.’’