|
गतवर्षीपासून कोरोनाचे संकट चालू झाल्यामुळे प्रत्येकच सण-उत्सव साजरे करण्यावर बंधने येत आहेत. असे असले तरी धर्मप्रेमींसाठी श्रीरामनवमीच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या वतीने ‘ऑनलाईन’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. भाविकांच्या मनामनांत श्रीराम असल्याने या उत्सवास धर्मप्रेमींचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. या सोहळ्यात ‘ऑनलाईन’ श्रीरामाचा नामजप, श्रीरामाची गुणवैशिष्ट्ये सांगणारे प्रवचन, श्रीरामरक्षास्तोत्र, ३ वेळा शंखनाद, श्रीरामाचा पाळणा ऐकवणे आणि नंतर रामराज्यासाठी प्रतिज्ञा घेण्यात आली. या सोहळ्यात अनेक धर्मप्रेमींनी ‘ऑनलाईन’ सहभाग घेण्यासह त्यांनी कृतीशील सहभाग नोंदवला. महाराष्ट्रातून या सोहळ्यासाठी ५ सहस्रांहून अधिक धर्मप्रेमी उपस्थित होते. या सर्वांना हा सोहळा भावपूर्ण अनुभवता आला.
श्रीरामनवमीला रामराज्य स्थापनेचा संकल्प करूया ! – सुमित सागवेकर, युवा संघटक, हिंदु जनजागृती समिती
सोलापूर – प्रभु श्रीराम आदर्श राजा, आदर्श पुत्र, आदर्श पती, धर्मपालक, एकवचनी-एकबाणी असे सर्वदृष्ट्या आदर्श होते. आपल्याला रामचरित्रातून स्वत:च्या हृदयात रामराज्य स्थापन करायचे आहे. सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आपल्याला हिंदु राष्ट्राची, म्हणजेच रामराज्याच्या स्थापनेची दिशा दिली आहे. त्यामुळे सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने घेण्यात येणार्या विविध उपक्रमांत सहभागी होऊन रामराज्य स्थापनेच्या कार्यात सहभागी व्हा, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे युवा संघटक श्री. सुमित सागवेकर यांनी केले. येथे ‘ऑनलाईन’ श्रीरामनवमी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते ‘असे साकारूया रामराज्य !’ या विषयावर बोलत होते. या सोहळ्याला सोलापूर, लातूर, धाराशिव, बीड येथील १ सहस्रांहून अधिक जिज्ञासू आणि धर्मप्रेमी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धर्मप्रेमी श्री. विक्रम लोंढे यांनी केले.
संभाजीनगर – उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, नगर येथे ‘ऑनलाईन’ श्रीराम नामसंकीर्तन आणि श्रीरामजन्मोत्सव सोहळा यांचे आयोजन करण्यात आले. गुढीपाडव्यापासून चालू झालेल्या नामसंकीर्तनाचा रामनवमीच्या दिवशी समारोप करण्यात आला. १३ एप्रिलपासून सर्व रामभक्त प्रतिदिन ऑनलाईनद्वारे नामसंकीर्तनासाठी सहभागी होत होते.
या सत्संगात प्रतिदिन प्रभु श्रीरामाची गुणवैशिष्ट्ये उपस्थितांना सांगून प्रभु श्रीरामाचा नामजप करण्यात येत होता. या ऑनलाईन नामसंकीर्तनाचा संभाजीनगर, जालना आणि नाशिक येथून २४० हून अधिक; नांदेड, परभणी आणि मानवत येथून १०० हून अधिक, तर जळगाव, धुळे आणि नंदुरबार येथून ६५ हून अधिक, तसेच नगर येथून १२० कुटुंबांनी याचा लाभ घेतला.
कोल्हापूर – येथे घेण्यात आलेल्या ‘ऑनलाईन’ सोहळ्यामध्ये ‘मर्यादापुरुषोत्तम प्रभु श्रीराम यांच्याप्रमाणे आदर्श राज्य रामनवमीच्या निमित्ताने स्थापण्याचा निर्धार करूया’, असे आवाहन समितीचे श्री. किरण दुसे यांनी केले. या सोहळ्यासाठी ५०० हून अधिक रामभक्तांची उपस्थिती होती.
चिंचवड आणि नाशिक रस्ता (पुणे) – येथे रामनवमीपूर्वी ७ दिवस ४० ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने नामजप आणि रामरक्षा पठण घेण्यात आले. याचा लाभ १ सहस्र १९४ जिज्ञासूंनी घेतला. तसेच ३९ ठिकाणी रामनवमीनिमित्त प्रवचनांचे आयोजन करण्यात आले. येथे फलक लेखनाच्या माध्यमातून ४५ ठिकाणी प्रसार करण्यात आला. समितीचे श्री. नीलेश जोशी यांनी ‘ऑनलाईन’ नामजप सोहळ्यात नामजप आणि रामनवमी यांचे महत्त्व सांगितले.
पुणे शहर आणि भोर – येथे ८६ ठिकाणी ‘ऑनलाईन’ नामसत्संग सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या सोहळ्याचा २ सहस्रांहून अधिक जिज्ञासूंनी लाभ घेतला, तर २४ ठिकाणी प्रवचनांचे आयोजन करण्यात आले. या प्रवचनाचा लाभ ४६१ जिज्ञासूंनी घेतला. विशेष म्हणजे येथे युवा साधकांसाठी ११ ठिकाणी नामसत्संगाचे आयोजन करण्यात आले. याचा ३४८ युवा साधकांनी लाभ घेतला.
सांगली – जिल्ह्यातील ईश्वरपूर येथे वाचक, हितचिंतक, विज्ञापनदाते आणि धर्मप्रेमी यांच्यासाठी ऑनलाईन नामजपाचे आयोजन करण्यात आले. याचा लाभ १९३ जिज्ञासूंनी घेतला. अशाच प्रकारे विटा येथे आयोजित कार्यक्रमात धर्मप्रेमी आणि त्यांचे कुटुंबीय सहभागी झाले होते. सांगली शहरात धर्मप्रेमींसाठी २ ‘ऑनलाईन’ प्रवचने घेण्यात आली. गावभागात आयोजित केलेल्या सोहळ्यात २०० पेक्षा अधिक धर्मप्रेमी सहभागी झाले.
विशेष
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर आरंभलेला हा ‘ऑनलाईन’ नामसंकीर्तन सत्संग वर्षभर चालू ठेवण्याची मागणी भक्तांनी केली. तसेच ‘हनुमान जयंतीलाही असेच आयोजन करा’, असेही जिज्ञासूंनी या वेळी सांगितले.
धर्मप्रेमींनी केलेले विशेष प्रयत्न
|
उपक्रमाविषयी जिज्ञासूंचे अभिप्राय
|