मुंबईत रेमडेसिविर इंजेक्शनऐवजी गोळ्यांची भुकटी देऊन महिलेची फसवणूक !

जीवन-मरणाचा प्रश्‍न भेडसावत असतांना फसवणूक करण्याची एकही संधी न सोडणार्‍यांना कठोर शासन करायला हवे !

मुंबई – घाटकोपर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार घेणार्‍या एका रुग्णाला ६ रेमडेसिविर इंजेक्शनची आवश्यकता होती; म्हणून रुग्णाच्या महिला नातेवाइकाने सामाजिक संकेतस्थळावरील विज्ञापन बघून इंजेक्शनची ‘ऑनलाईन’ मागणी केली. त्या वेळी तिला इंजेक्शनऐवजी ‘क्रोसिन’ आदी औषधी गोळ्यांची भुकटी टाकण्यात आलेल्या कुप्या प्राप्त झाल्या. महिलेने फसवणूक झाल्याप्रकरणी टिळकनगर पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली. महिलेने दिलेल्या तांत्रिक माहितीच्या आधारे पोलीस फसवणूक करणार्‍याचा शोध घेत आहेत.

महिलेने विज्ञापनातील क्रमांकावर संपर्क साधून इंजेक्शनच्या ६ कुप्यांची मागणी केली. यासाठी तिने ‘ऑनलाईन’ १८ सहस्र रुपये वळते (ट्रान्स्फर) केले. त्यानंतर महिलेच्या घरी ५ कुप्या असलेले पार्सल आले. प्रत्येक कुपीत रेमडेसिविर नसून औषधी गोळ्यांची भुकटी होती.