चाकण (जिल्हा पुणे) येथील एका खासगी रुग्णालयातील ऑक्सिजन संपल्याने ३ रुग्णांचा मृत्यू !

प्रतिकात्मक छायाचित्र

शेलपिंपळगाव (जिल्हा पुणे) – चाकणमधील एका खासगी रुग्णालयातील ऑक्सिजन संपल्याने ३ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. २० अत्यवस्थ रुग्णांना २० एप्रिलच्या पहाटे तातडीने अन्यत्र हालवण्यात आले. मृतांमध्ये २५ वर्षीय युवक, ४५ वर्षीय गृहस्थ आणि ६५ वर्षीय महिला यांचा समावेश आहे. या प्रकरणी चौकशी करण्यात येत असल्याचे चाकण ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. नंदा ढवळे यांनी सांगितले. या रुग्णालयात १९ एप्रिल या दिवशी ऑक्सिजन संपल्यानंतर काही रुग्णांच्या नातेवाइकांनी महाळुंगे येथून ऑक्सिजन सिलिंडरसाठी धावाधाव केली. त्यानंतर काही ऑक्सिजन सिलिंडर मिळाले; मात्र २० एप्रिलच्या पहाटे ते संपले. यानंतर रुग्णालय प्रशासनाने रुग्णांना देण्यासाठी ऑक्सिजन नसल्याचे सांगत सर्व अत्यवस्थ रुग्णांना तातडीने अन्य ठिकाणी हालवण्यास सांगितले. यांतील ३ रुग्णांचा अन्यत्र जाण्याच्या प्रयत्नात ऑक्सिजनअभावी जीव गेला. यात आणखी काही मृत्यू झाले आहेत का, याविषयीची चौकशी करण्यात येत आहे, असे डॉ. नंदा ढवळे यांनी सांगितले.