नाशिक येथील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजनच्या गळतीमुळे २४ रुग्णांचा मृत्यू !

रुग्णालय प्रशासनाचा हलगर्जीपणा कारणीभूत असल्याचा नातेवाइकांचा आरोप

आरोग्यक्षेत्राच्या व्यवस्थापनाचे धिंडवडे काढणारी घटना ! एकीकडे ऑक्सिजनअभावी, तर दुसरीकडे उपलब्ध ऑक्सिजनच्या गळतीमुळे नागरिकांचा मृत्यू होणे, यापेक्षा आरोग्ययंत्रणेला लज्जास्पद दुसरे काय असू शकते ? या घटनेस उत्तरदायी असलेल्यांना सरकारने आजन्म कारागृहात टाकले पाहिजे !

नाशिक – येथील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात २१ एप्रिल या दिवशी ऑक्सिजनची गळती झाल्याने ‘व्हेंटिलेटर’वर असलेल्या २४ रुग्णांचा मृत्यू झाला. मृतांच्या नातेवाइकांनी रुग्णालयात आक्रोश केला. रुग्णालय प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे हा प्रकार झाल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाइकांनी केला. पोलिसांनी त्वरित घटनास्थळी येऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. सध्या गळती झालेल्या पाईपचे वेल्डिंग करण्यात आले असून रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा पूर्ववत झाला आहे; मात्र काही रुग्णांची स्थिती अद्यापही गंभीर असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या दुर्घटनेला उत्तरदायी कोण ? हे अद्याप पुढे आलेले नाही. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन रुग्णालयाच्या बाहेर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

रुग्णालय प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार रुग्णालयात ऑक्सिजनचा पुरवठा होत असलेल्या टाकीमध्ये गळती झाली. त्यामुळे रुग्णांचा ऑक्सिजनचा पुरवठा खंडित झाला. अचानक ऑक्सिजन खंडित झाल्याने ‘व्हेन्टिलेटर’ वर असलेल्या रुग्णांना श्‍वास घेणे अवघड झाले आणि त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.

गळतीची दुरुस्ती होऊन ऑक्सिजनचा पुरवठा पूर्ववत् होण्यासाठी अर्धा घंटा लागला. या कालावधीत आजूबाजूच्या रुग्णालयांतून ऑक्सिजनचे सिलेंडर आणून रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात आला. नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी ऑक्सिजनचा पुरवठा पूर्ववत् झाल्याचे सांगितले. या प्रकारानंतर रुग्णालयाच्या आवारात नातेवाइकांनी त्यांचा क्षोभ व्यक्त केला. ‘बरे होत आलेले रुग्ण प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे मृत्यूमुखी पडले, आरोग्य कर्मचारी दुर्लक्ष करत होते, परिचारिका भ्रमणभाषवरच अधिक वेळ असायच्या’, असे आरोप त्यांनी केले.

ऑक्सिजनवर १५० रुग्ण असतांना ऑक्सिजनच्या टाकीच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष का झाले ?

गळती झालेल्या ऑक्सिजनच्या टाकीच्या दुरूस्तीचे काम खासगी संस्थेकडे देण्यात आले होते. यापूर्वीही गळतीच्या शक्यतेमुळे टाकीच्या दुरुस्तीचे काम करण्यात आले होते. रुग्णालयात एकूण १५० रुग्ण ऑक्सिजनवर होते. त्यांतील २३ रुग्ण ‘व्हेंटिलेटर’वर होते. एवढ्या मोठ्या प्रमाणात रुग्ण ऑक्सिजनवर असतांना टाकीच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष का करण्यात आले ? दुरुस्ती वेळेवर का झाली नाही ? या प्रश्‍नांची उत्तरे मिळालेली नाहीत.

प्रतिक्रिया

ऑक्सिजनच्या गळतीमुळेच मृत्यू झाल्याचा प्राथमिक अहवाल ! – डॉ. राजेंद्र शिंगणे, अन्न आणि औषध प्रशासन मंत्री

या घटनेचा प्राथमिक अहवाल प्राप्त झाला असून ऑक्सिजनच्या गळतीमुळेच ही दुर्घटना झाली आहे. या घटनेचे अन्वेषण करण्यात येईल. ही दुर्घटना कुणाच्या चुकीमुळे झाली, हे शोधून संबंधितांवर कारवाई करण्यात येईल.

असा प्रकार अन्यत्र होणार नाही, याची प्रशासनाने काळजी घ्यावी ! – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते, विधानसभा

रुग्णालयातील अन्य रुग्णांकडे लक्ष देणे आवश्यक आहे. या प्रकरणाचे सखोल अन्वेषण होईल; मात्र असा प्रकार अन्यत्र होणार नाही, याची प्रशासनाने काळजी घ्यायला हवी. जे रुग्ण मृत्यूमुखी पडले आहेत, त्यांच्या कुटुंबियांना आधार द्यायला हवा.

उच्चपदस्थ समितीद्वारे चौकशी करणार ! – छगन भुजबळ, पालकमंत्री, नाशिक जिल्हा

नक्की दोष कुणाचा आहे, हे शोधणे आवश्यक आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी उच्चपदस्थ समिती नेमत आहोत.

हलगर्जीपणा झाला असेल, तर संबंधितांवर कडक कारवाई करायला हवी ! – राज ठाकरे, मनसे

निष्पाप रुग्णांना जीव गमवावा लागला. ही घटना वेदनादायी आहे. मृतांना मनसेची श्रद्धांजली आहे. आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण आहे; पण हलगर्जीपणा झाला असेल, तर संबंधितांवर कडक कारवाई करायला हवी.

हलगर्जीपणा झाला असेल, तर संबंधितांवर कडक कारवाई करायला हवी ! – राज ठाकरे, मनसे

निष्पाप रुग्णांना जीव गमवावा लागला. ही घटना वेदनादायी आहे. मृतांना मनसेची श्रद्धांजली आहे. आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण आहे; पण हलगर्जीपणा झाला असेल, तर संबंधितांवर कडक कारवाई करायला हवी.

हृदय पिळवटून टाकणारी घटना ! – पंतप्रधान मोदी

ऑक्सिजन टँकची गळती झाल्यामुळे नाशिकमधील रुग्णालयात घडलेली घटना ही हृदय पिळवटून टाकणारी आहे. यात जीवितहानी झाल्याने मन हेलावले आहे. दु:खाचा डोंगर कोसळलेल्या कुटुंबियांचे सांत्वन, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केले आहे.