२२ एप्रिलला सर्वोच्च न्यायालयात होणार सुनावणी
पणजी, २० एप्रिल (वार्ता.) – अपात्रता याचिका प्रविष्ट केल्यावर सुमारे दीड वर्षाहून अधिक काळ उलटल्यानंतर गोवा विधानसभेचे सभापती राजेश पाटणेकर यांनी २० एप्रिल या दिवशी काँग्रेसचे १० माजी आमदार आणि मगोपचे २ माजी आमदार यांच्या विरोधातील अपात्रता याचिकेवर निर्णय दिला आहे. सभापती राजेश पाटणेकर यांनी एका ओळीत आमदार अपात्रता याचिका फेटाळत आहोत आणि सविस्तर निवाडा नंतर देऊ, असे याचिकादारांना सांगितले. काँग्रेसचे १० आमदार आणि मगोपचे २ आमदार यांनी त्यांच्या संबंधित पक्षाला सोडचिठ्ठीदेऊन भाजपात प्रवेश केला होता. आता या प्रकरणी २२ एप्रिलला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.
निवाड्याची प्रत मिळाल्यानंतर पुढील निर्णय ! – सुदिन ढवळीकर, आमदार, मगोप
सभापती राजेश पाटणेकर यांनी सविस्तर निवाड्याची प्रत देणार असल्याचे म्हटले आहे. सभापती राजेश पाटणेकर यांच्या निवाड्याचा अभ्यास करून या निर्णयाला आव्हान देण्यासंबंधी पुढील निर्णय घेतला जाईल, असे मत मगोपचे आमदार श्री. सुदिन ढवळीकर यांनी व्यक्त केले. सभापतींचा निवाडा, हा आमचा विजय ! – गिरीश चोडणकर, काँग्रेस
गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे गिरीश चोडणकर म्हणाले, ‘‘सभापती राजेश पाटणेकर यांनी एका ओळीत दिलेल्या निवाड्यात नवीन असे काहीच नाही. त्यांचा निर्णय हा पक्षपाती आहे. हा निवाडा म्हणजे आमचा विजय आहे. आम्ही सर्वोच्च न्यायालयात न्याय मागिल्यानेच आम्हाला हा निवाडा मिळू शकला आहे. सभापती पाटणेकर यांच्या निवाड्याचा अभ्यास करून नंतर निर्णयाला आव्हान देण्याविषयी ठरवणार आहे.’’
आम्हाला न्याय मिळेलच ! – दिगंबर कामत, विरोधी पक्षनेते
सत्याचा नेहमी विजय होतो आणि यासाठी काही दिवसच वाट पहावी लागणार आहे. आम्हाला न्याय मिळणार. भारतीय घटना सर्वश्रेष्ठ आहे आणि अन्य कोणतीही शक्ती या घटनेहून श्रेष्ठ होऊ शकत नाही. (लोकमान्य टिळकांनी ब्रिटिशांच्या काळात त्यांच्यावरील खटल्याच्या निकालानंतर इंग्रज न्यायाधिशांना भर न्यायालयातच ‘तुमच्याहून श्रेष्ठ देवाचे न्यायालय आहे’, अशा आशयाचे वाक्य बोलून ठणकावले होते. त्यामुळे घटनेचा आधार घेऊन जनताद्रोह करणार्या सर्वांनीच ही ऐतिहासिक घटना नेहमी आठवावी ! – संपादक)