प्रजा सुखी समाधानी रहाण्यासाठी राजा आणि त्याचा राज्यकारभार श्रीरामासारखा आदर्शच असायला हवा !

प.प. भगवान श्रीधरस्वामी

‘राजा बोले दळ हाले’, ‘नेत्याप्रमाणेच अनुयायी’, ‘जसे घर तसे वासे’, ‘बाप तसा बेटा’, ‘कुंभार तसा लोटा’, ‘घराची कळा अंगण दाखवते’, ‘गुरु तसा चेला’ या सर्व म्हणी ध्यानात (लक्षात) घेण्यासारख्या आहेत. प्रजा ही केव्हाही राजा, मंत्री, महंत, पुढारी यांचे अनुकरण करते, हे स्वाभाविक आहे. स्वतःचे आचरण समाजाला अनुकरणीय होऊन आपले विचार त्यास प्रमाणभूत होतात. हे तत्त्व न विसरता कोणत्याही तर्‍हेने आपल्या आचार-विचारांनी समाजाच्या उन्नतीस कोणताच अपाय होणार नाही, असा खोलवर विचार करून दीर्घदृष्टीने आणि वेदशास्त्रांच्या योग्य पर्यालोचनाने राजाने किंवा मंत्र्यांनी राज्यकारभार चालवला पाहिजे अन् तद्नुषंगाने शासनाचे नियम आखले पाहिजेत.’

धर्म म्हणजे श्रीराम आणि श्रीराम म्हणजेच धर्म !

‘धर्म म्हणजे श्रीराम ! श्रीराम म्हणजेच चालता-बोलता सगुण साकार धर्म. श्रीरामाचे आदर्श जीवन आदरणीय, आचरणीय, वंदनीय आणि पूजनीय आहे. इतकेच काय, श्रीराम धर्मरूपच आहे; म्हणूनच श्रेष्ठ धर्म आणि श्रीराम यांच्यामध्ये भिन्नभाव दिसत नाही.

ज्यांच्या आचरणातून सहज सद्गुण बाहेर पडतात, म्हणजेच अनायासे अकृत्रिम वासना असते, असा तोच सत्पुरुष ज्यांना देहवासना, लोकवासना आणि शास्त्रवासना असत नाही.’

– प.प. भगवान श्रीधरस्वामी

(संदर्भ : मासिक ‘श्रीधर-संदेश’, फेब्रुवारी १९९० आणि ऑगस्ट १९९८)