रेमडेसिविर इंजेक्शन आणि औषधे यांचा साठा उपलब्ध करून देण्याची मागणी
नागपूर – शहरात मागील २ दिवसांपासून एकही रेमडेसिविर इंजेक्शन सरकारकडून पुरवण्यात आलेले नाही. त्यामुळे भाजपचे नेते आणि माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे ४ आमदार आणि १ खासदार यांनी १९ एप्रिलपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन चालू केले आहे. भाजपचे खासदार विकास माहात्म्ये, विधानपरिषदेचे आमदार प्रवीण दटके आणि आमदार गिरीश व्यास, विधानसभेचे आमदार कृष्णा खोपडे, विकास कुंभारे यांनी धरणे आंदोलनात सहभाग घेतला आहे.
‘नागपूरसाठी तात्काळ औषधसाठा, ऑक्सिजन, रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध करून देण्याविषयी जोपर्यंत आदेश काढला जात नाही, तोपर्यंत आंदोलनातून उठणार नाही’, अशी चेतावणी भाजपचे आमदार आणि खासदार यांनी दिली आहे. ‘महाविकास आघाडी सरकार अत्यावश्यक आरोग्य सुविधा पुरवतांना नागपूर जिल्ह्यावर अन्याय करत आहे. इतर जिल्ह्याला द्यायच्या असतील, तेवढ्या सुविधा द्या; पण नागपूर जिल्ह्यावर अन्याय करू नका. शहरातील वाढत्या मृत्यूंना सरकार कारणीभूत आहे, तसेच पश्चिम महाराष्ट्रात अनेक नेत्यांनी त्यांच्या भागात औषधांचा साठा नेला’, असा आरोपही त्यांनी केला आहे.