देहलीमध्ये २६ एप्रिलपर्यंत दळणवळण बंदी घोषित

कोरोनाचा वाढता प्रभाव

नवी देहली – देहली राज्यात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी दळणवळण बंदी लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उपराज्यपाल अनिल बैजल आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यात पार पडलेल्या बैठकीत याविषयीचा निर्णय घेण्यात आला. १९ एप्रिलच्या रात्री १० वाजल्यापासून ते २६ एप्रिल सकाळपर्यंत ही दळणवळण बंदी रहाणार आहे. या काळात विनाकारण बाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे. केवळ अत्यावश्यक सेवांतील कर्मचार्‍यांना घराबाहेर पडण्याची अनुमती असणार आहे. तसेच सर्व खासगी कार्यालयांना ‘वर्क फ्रॉम होम’ करण्याचे निर्देश देण्यात आले असून सरकारी कार्यालयांमधील कर्मचार्‍यांची उपस्थितीही अर्धी असेल. ज्या लोकांचे विवाहाचे दिनांक यापूर्वीच ठरले आहेत त्यांना केवळ ५० जणांच्या उपस्थितीत लग्न करण्याची अनुमती देण्यात आली असून यासाठी इ-पास बंधनकारक करण्यात आले आहेत.

मुख्यमंत्री केजरीवाल म्हणाले की, सध्या देहलीमध्ये प्रतिदिन २५ सहस्रांंच्या जवळपास रुग्ण सापडत आहेत. देहलीतील रुग्णालयांमध्ये खाटांची, औषधांची आणि ऑक्सिजनची कमतरता आहे. देहलीतील आरोग्ययंत्रणा अधिक रुग्णसंख्येचा ताण सहन करू शकणार नाही. यासाठी दळणवळण बंदी आवश्यक आहे.


दारूच्या दुकानांबाहेर प्रचंड गर्दी !

यातून नागरिकांची मानसिक स्थिती लक्षात येते ! असे नागरिक असणारा देश कधीतरी मानसिकदृष्ट्या कणखर आणि सक्षम असू शकेल का ?

नवी दिल्ली – देहलीमध्ये दळणवळण बंदी लागू होण्याचे घोषित होताच मद्यपींनी दारूच्या दुकानांसमोर मोठी गर्दी केल्याचे दिसून आले. येथील गोल मार्केटमध्ये दारूच्या दुकानांबाहेर प्रचंड गर्दी झाली. याठिकाणी मद्यपी एक-एक पेटी भरून बिअरच्या बाटल्या घेऊन जातांना दिसत होते. येथील गर्दी पहाता पोलिसांना गर्दीचे नियोजन करावे लागले. मागील वर्षीही दळणवळण बंदीच्या पूर्वी अशाच पद्धतीने दारूच्या दुकानांबाहेर रांगा लागलेल्या दिसून येत होत्या.