कोल्हापूर – कोरोना काळात उद्योगधंदे बंद झाल्याने गेल्या ४ दिवसांत कोल्हापुरातील जवळपास १० सहस्रांपेक्षा अधिक परप्रांतीय कामगार गावाकडे रवाना झाले आहेत. काही जण रेल्वेने, तर काही जण खासगी गाडीने प्रामुख्याने झारखंड, बिहार आणि उत्तरप्रदेश राज्यातील त्यांच्या मूळ गावी रवाना झाले आहेत. त्यामुळे कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांनी परप्रांतीय कामगारांची काळजी घेतली जाईल, असे दिलेले आश्वासन फोल ठरल्याचे दिसत आहे.
कोरोनाच्या संदर्भात कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यातील अन्य महत्त्वाच्या घडामोडी
१. कोल्हापूर महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांना १६ एप्रिल या दिवशी दसरा चौकात कॅनरा बँकेसमोर गर्दी दिसली. त्या वेळी आयुक्तांनी बँक अधिकार्यांची कानउघाडणी करून पुन्हा गर्दी दिसल्यास कारवाई करू अशी चेतावणी दिली.
२. शिवसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर यांना कोरोनाची लागण झाली असून ते सध्या कोल्हापूर शहरात उपचार घेत आहेत.
३. कोल्हापूर शहरातही रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे. दिवसभर जिल्हाधिकारी कार्यालयातील यासाठी स्थापन केलेल्या कक्षासमोर नातेवाइकांची गर्दी आढळून आली.