जगात भारताची लाज काढणारी आरोग्यव्यवस्था ! अशा व्यवस्थेकडून आपल्या प्राणांचे रक्षण होईल, अशी अपेक्षा करण्याऐवजी भारतियांनी आता देवाचा धावा करावा, हेच अधिक योग्य ठरील ! नाहीतरी गुजरात उच्च न्यायालयाने ही स्थिती पाहून ‘भगवान भरोसे’ रहाण्याचा सल्ला दिलाच आहे !
पाटलीपुत्र (बिहार) – शहरातील दुसरे मोठे रुग्णालय असलेल्या एन्.एम्.सी.एच्.मध्ये अनेक कोरोना रुग्णांचे मृत्यू होत आहेत. रुग्णालयाच्या बाहेर रुग्णवाहिकांची रांग लागली आहे. वेळेत उपचार मिळत नसल्याने अनेक रुग्ण रुग्णवाहिकेतच प्राण सोडत आहेत. त्यामुळे नातेवाइक संतापले आहेत. रुग्णालयातील परिस्थितीही विदारक आहे. ऑक्सिजनचा पुरवठा पुरेशा प्रमाणात होत नसल्याने रुग्णांच्या शरिरात बिसलेरीचे पाणी चढवले जात आहे. डॉक्टर रुग्णांना तपासण्यासही येत नाहीत. रुग्णालयात खाट न मिळाल्याने बाहेर प्रतीक्षेत असलेल्या रुग्णांची संख्या मोठी आहे. रुग्णांचे नातेवाइक कित्येक घंटे बाहेर ताटकळत थांबले आहेत. रुग्णालय प्रशासनाकडून प्रतिसाद मिळत नसल्याने अनेक जण रुग्णांना घेऊन घरी जात आहेत, अशी स्थिती आहे.
१३ एप्रिलला या रुग्णालयाला आरोग्यमंत्र्यांनी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. त्याच वेळी रुग्णवाहिकेत असलेल्या एका रुग्णाला भरती करून न घेतल्याने त्याचा रुग्णालयाच्या बाहेर मृत्यू झाला होता.