तीन नंदादीप : क्रांतीकारक चापेकर बंधू !

१८.४.२०२१ या दिवशी क्रांतीकारक दामोदर चापेकर बलीदानदिन आहे. यानिमित्ताने…

घोर नैसर्गिक आपत्तीमध्ये जनतेवर अत्याचार करणार्‍या रँडचा चापेकर बंधूंनी सूड घेणे

‘देशामध्ये इंग्रजांचे सरकार होते. वर्ष १८६६ मध्ये पुणे येथे प्लेगचा भयंकर प्रकोप झाला होता. प्रतिदिन शेकडो लोक मृत्यूमुखी पडत होते. इंग्रज सरकारने वॉल्टर चार्ल्स रँड याला प्लेग रोखण्यासाठी आयुक्त (कमिशनर) बनवून पुण्याला पाठवले. प्लेग पीडित जनतेला साहाय्य करण्याच्या नावाखाली रँडने जनतेवर अनन्वित अत्याचार करण्यास प्रारंभ केला. सर्वत्र त्राहि-त्राहि माजली. लोकमान्य टिळक यांनी त्यांच्या ‘केसरी’ वृत्तपत्रामध्ये रँडच्या अत्याचारांचा खंबीरपणे विरोध केला; परंतु रँडचे अत्याचार वाढतच गेले. घोर नैसर्गिक आपत्तीत होत असलेल्या अत्याचारांनी द्रवलेल्या पुण्याच्या हरिपंतराव चापेकर यांच्या दामोदर, बाळकृष्ण आणि वासुदेव या ३ पुत्रांचे रक्त उसळून आले. ते तिघेही लोकमान्य टिळक यांचे शिष्य होते अन् व्यायाम शाळा चालवून देशभक्त नवयुवकांचे संघटन करत होते.

दामोदरपंतांनी राक्षसी रँडला शिक्षा करून देशाच्या जनतेवरील अत्याचार आणि अपमान यांचा सूड उगवण्याचा निश्‍चय केला. पुण्याच्या राजभवनात इंग्लंडची महाराणी व्हिक्टोरिया यांच्या राज्यरोहणाच्या हीरक महोत्सवाचा कार्यक्रम होता. तो कार्यक्रम झाल्यावर रँड मदमस्त होऊन रात्री १२ वाजता बग्गीमध्ये बसून घरी परत येत होता. दामोदर आणि बाळकृष्ण यांनी त्यांच्या मित्रांसह सुनियोजितपणे रँडवर आक्रमण करून अन् त्याच्या मागे असलेल्या रक्षक लेफ्टनंट आर्यरेस्टवर गोळी चालवून त्यांना यमसदनी पाठवले. यानंतर ते दोघे पळून गेले. लोकमान्य टिळक यांना बातमी दिली की, ‘काम फत्ते (पूर्ण) झाले.’ संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ माजली. २ मास जंग जंग पछाडूनही पोलिसांना रँड आणि आर्यस्ट यांच्या मारेकर्‍यांचा पुरावा मिळू शकला नाही. शेवटी २० सहस्र रुपयांचे बक्षीस मिळवण्याच्या लालसेने गणेश शंकर आणि रामचंद्र द्रविड या दोन राष्ट्रद्रोही युवकांनी दामोदर यांचा पत्ता पोलिसांना दिला. दामोदर पकडले गेले; परंतु बाळकृष्ण भूमिगत झाले.

दामोदर यांच्या दोन भावांनीही देशासाठी प्राणार्पण करणे आणि ‘चापेकर बंधू’ इतिहासात अमर होणे

पोलिसांनी पकडल्यानंतर दामोदर यांना येरवडा कारागृहात १८.४.१८९८ या दिवशी फाशी देण्यात आली. बाळकृष्णाच्या शोधात असणार्‍या पोलिसांनी अनेक निरपराध लोकांना पकडून अत्याचार चालू केले. त्यामुळे बाळकृष्णाने पोलिसांसमोर स्वतःहून आत्मसमर्पण केले. सिंहाचा छावा लहान बंधू वासुदेव त्याच्या मातेकडे जाऊन म्हणू लागले, ‘‘दोघे बंधू देशकार्यासाठी कामी आले. माते, मलाही आज्ञा दे.’’ अशा प्रकारे आज्ञा घेऊन वासुदेवाने मातेला चरणस्पर्श केला आणि आपला सहकारी महादेव रानडेच्या साहाय्याने राष्ट्रद्रोही फितुर रामचंद्र द्रविडला यमसदनी पाठवले. पोलिसांनी सर्व बाजूंनी घेरून वासुदेव आणि महादेव यांना पकडले. ८.५.१८९९ या दिवशी वासुदेव चापेकर, १०.५.१८९९ या दिवशी महादेव रानडे आणि १६.५.१८९९ या दिवशी बाळकृष्ण चापेकर यांना फाशी देण्यात आली.

चापेकर बंधूंच्या बलीदानानंतर स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी देशाच्या शत्रूंशी आजीवन लढण्याची प्रतिज्ञा करणे

एकाच मातेचे ३ पुत्र अवघे २७, २४ आणि १८ वर्षांच्या अल्पायुमध्ये राष्ट्रमातेच्या बलीवेदीवर चढले. यामुळे शिखांचे १० वे गुरु गोविंदसिंह यांचे पिता, माता, आजी आणि ४ पुत्र यांच्या बलीदानाची स्मृती ताजी झाली. चापेकर बंधूंच्या बलीदानाने स्वातंत्र्यवीर दामोदर सावरकर यांची निद्राच भंग झाली. क्रांतीवीर सावरकर यांनी चापेकर बंधूंच्या चितेच्या भस्माचा टिळा लावून प्रतिज्ञा केली की, ‘मी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी सशस्त्र क्रांतीचा मार्ग अवलंबणार. देशाच्या शत्रूंशी आजीवन लढत राहीन.’ शेवटी सावरकर यांची प्रतिज्ञा रंगली.

चापेकर बंधू यांच्या वीर मातेने बलीदानाविषयी काढलेले उद्गार

एकाच परिवाराच्या ३ तेजस्वी राष्ट्रभक्त पुत्रांच्या बलीदानाचे वृत्त ऐकून स्वामी विवेकानंद यांच्या शिष्या भगिनी निवेदिता शोकविव्हळ होऊन चापेकर बंधूंच्या मातेचे सांत्वन करण्यासाठी पुणे येथे गेल्या. निवेदिता काही बोलण्यापूर्वीच वीर माता म्हणाली, ‘‘मुली, यामध्ये दुःख व्यक्त करण्यासारखी कोणतीच गोष्ट नाही. कोट्यवधी लोकांची माता असलेल्या भारतमातेच्या मुक्तीसाठी माझ्या पुत्रांनी बलीदान केले आहे. आपण दुःख व्यक्त केले, तर त्यांच्या बलीदानाचा अपमान होईल.’’

‘धन्य आहे ती देशभक्त माता !’ भगिनी निवेदिता त्या मातेची चरणधूळ माथी लावून परत गेल्या. असे वीर पुत्र आणि वीर माता पुण्यभूमी भारतातच अवतरित होऊ शकतात. वीर माता (भारतमाता) आणि तिच्या लाडक्या ३ नंदादीपासारखे तेवत असलेल्या चापेकर बंधूंना प्रणाम !’