गुजरातमधील गांधीनगर येथे रुग्णवाहिकेतून न आणल्याने उपचारास नकार
|
गांधीनगर (गुजरात) – येथे कोरोनाग्रस्त रुग्णांसाठी असलेल्या रुग्णवाहिकेचा वापर करून रुग्णालयात न आणल्याने गुजरात केंद्रीय विद्यापिठात ‘स्कूल ऑफ नॅनोसायन्स’च्या प्रमुख असणार्या डॉ. इंद्राणी बॅनर्जी यांच्यावर उपचार करण्यास रुग्णालयाने नकार दिला. त्यामुळे डॉ. बॅनर्जी यांना जीव गमवावा लागला. डॉ. इंद्राणी बॅनर्जी यांना २ दिवसांपासून श्वास घेण्यास त्रास जाणवत होता. त्यांचे काही सहकारी आणि विद्यार्थी यांनी त्यांना उपचारासाठी खासगी वाहनातून कर्णावती कोविड रुग्णालयात नेले; पण या वेळी रुग्णालयाने त्यांना योग्य रुग्णवाहिकेतून आणण्यात आले नसल्याचे सांगत उपचार करण्यास नकार दिला. वेळेत उपचार न मिळाल्याने त्यांचे निधन झाले.
भोपाळमध्ये ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे ५ रुग्ण दगावले !
भोपाळ (मध्यप्रदेश) – येथे ऑक्सिजनच्या अभावामुळे २० पेक्षा अधिक कोविड रुग्णालयांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. रुग्णांना वेळेवर ऑक्सिजन न मिळाल्यामुळे येथील सिटी रुग्णालयामध्ये ५ रुग्ण दगावले. विशेष म्हणजे एका दिवसापूर्वी सरकारने राज्यात ऑक्सिजनाचा पुरेसा साठा असल्याचे सांगितले होते. (अशा प्रकारचे विधान करणे म्हणजे जनतेची दिशाभूल करण्यासारखे आहे ! एक तर यंत्रणा सरकारला चुकीची माहिती देत आहे किंवा सरकार चुकीची माहिती देत आहे, असे आहे का ? – संपादक)
ऑक्सिजन अभावी रुग्णालय व्यवस्थापनाकडून रुग्णाला बलपूर्वक डिस्चार्ज दिल्यावर मृत्यू !
अशा रुग्णालय व्यवस्थापनावर आणि राज्य प्रशासनावर गुन्हा नोंद करून त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे !
शहरात ऑक्सिजनचा मुबलक साठा नसल्याने काही रुग्णालयांमध्ये व्यवस्थापनाकडून रुग्णांना बलपूर्वक घरी पाठवले जात आहे. येथील पी.जी.एम्.बी. रुग्णालयामध्ये ऑक्सिजन नसल्याने एका रुग्णाला डिस्चार्ज दिला होता. त्या रुग्णाला दुसर्या रुग्णालयामध्ये नेतांना रस्त्यातच मृत्यू झाला.