बिहारमध्ये कोरोनाबाधित जिवंत व्यक्तीला मृत घोषित करून दुसर्‍याचाच मृतदेह कुटुंबियांकडे सुपुर्द !

अंत्यसंस्काराच्या वेळी चूक उघड !

कोरोनाच्या काळात अशा प्रकारच्या अनेक घटना देशभरात घडल्या आहेत आणि घडत आहेत. यातून रुग्णालय व्यवस्थापनाचा भोंगळ कारभार दिसून येतो. अशा गंभीर चुका टाळण्यासाठी संबंधितांवर कठोर कारवाई केली पाहिजे !

पाटलीपुत्र (बिहार) – येथील पी.एम्.सी.एच्. रुग्णालयात कोरोनाबाधित व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे सांगून दुसर्‍याच व्यक्तीचा मृतदेह कुटुंबियांना देण्यात आल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे कोरोना झालेली व्यक्ती जिवंत आहे. या घटनेमुळे रुग्णालय प्रशासनाच्या भोंगळ कारभाराविषयी संताप व्यक्त केला जात आहे.

येथील चुन्नू कुमार यांच्या पायाचा अस्थीभंग झाल्याने त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले होते. त्यांची कोरोना चाचणी केल्यावर त्यांना लागण झाल्याचे उघड झाले. त्यात त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती रुग्णालयाकडून त्यांच्या कुटुंबियांना देण्यात आली. कुटुंबियांना चुन्नू कुमार यांचा मृतदेह पिशवीमध्ये बंद करून देण्यात आला. हा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी स्मशानात नेण्यात आल्यावर त्यांच्या मुलाने शेवटचे दर्शन घेण्यासाठी पिशवी उघडून मृतदेहाचा तोंडावळा पाहिल्यावर ते त्यांचे वडील नसल्याचे लक्षात आले. याविषयी रुग्णालयाला कळवण्यात आल्यावर चुन्नू कुमार जिवंत असल्याचे समोर आले. या घटनेविषयी अधिष्ठाता आय.एस. ठाकूर यांनी ‘चूक मान्य करून चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात येईल’, असे सांगितले.