गुजरात उच्च न्यायालयाने कोरोनावरून गुजरात  सरकारला फटकारले !

आता आपण सगळे ‘भगवान भरोसे’ आहोत !

कर्णावती (गुजरात) – गुजरात राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांना खाटा उपलब्ध होत नाहीत. त्यांना औषधे मिळत नाहीत. आता लोकांना ‘आपण ‘भगवान भरोसे’ आहोत’, असे वाटत आहे. सरकारने कोरोनाच्या संदर्भात केलेल्या उपाययोजनांचे दावे आणि प्रत्यक्ष परिस्थिती यांत पुष्कळ भेद आहे, अशा शब्दांत येथील उच्च न्यायालयाने गुजरात सरकारला कोरोनाच्या परिस्थितीवरून फटकारले. अ‍ॅडव्होकेट जनरल कमल त्रिवेदी यांनी सरकारची बाजू मांडतांना गुजरात सरकारने केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली होती. गुजरात सरकारला रुग्णालयातील खाटा आणि औषधे यांच्या तुटवड्यावर सविस्तर अहवाल सादर करण्याचा आदेश न्यायालयाने या वेळी दिला.

१. उच्च न्यायालयाने म्हटले की, तुम्ही जे काही दावे करत आहात, त्यापेक्षा प्रत्यक्ष परिस्थिती वेगळी आहे. या वेळी लोकांचा सरकारवरील विश्‍वास न्यून झाला आहे. लोक सरकारवर टीका करत आहेत की, सरकारकडून काहीच होणार नाही. या संक्रमणाची साखळी तोडणे आवश्यक आहे.

२. न्यायालयाने प्रसारमाध्यमांच्या वृत्तांचा दाखला देत रेमडेसिविर इंजेक्शनच्या तुटवड्याचा प्रश्‍न उपस्थित केला. न्यायालयाने म्हटले की, लोकांना याची आवश्यकता असतांना, ज्या रुग्णालयांमध्ये आतापर्यंत इंजेक्शन मिळत होते त्या ठिकाणीही आता ते उपलब्ध नाही. मग सरकारने याचा पुरवठा मर्यादित का केला? औषधे उपलब्ध असतांनाही सरकारकडून त्याच्या पुरवठ्यावर नियंत्रण ठेवले जात आहे. लोकांना हे विकत का घेता येत नाही ? सगळीकडे हे औषध उपलब्ध होईल याची व्यवस्था करा. आम्हाला कारणे नको उपाय सांगा, अशा शब्दांना न्यायालयाने खडसावले.