हिदूंनो, धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांचा आदर्श घ्या !

‘कशासाठी आणि मरावे कसे मी ? ।
विचारू स्वतःला असा प्रश्‍न नेहमी ॥

लढू पांग फेडावया धर्मभूचे ।
आम्ही मार्ग चालू सइच्या सुताचे ॥

या श्‍लोकाप्रमाणे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे सर्व शिवपाईक धारकरी दैनंदिन जीवनात जगतात, तसेच देव, देश आणि धर्म यांचे कार्य करतात. फाल्गुन शुक्ल पक्ष प्रतिपदा ते फाल्गुन अमावास्या हा कालावधी महाराष्ट्र्रातील प्रत्येक धारकरी, शिवपाईक हे धर्मवीर बलीदान मास म्हणून पाळतात. याच काळात धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांना बंदी बनवून त्यांचा अमानवी छळ करून त्यांची औरंगजेबाकडून हत्या करण्यात आली. त्यामुळे हा मास धारकरी सुतक स्वरूपात पाळतात.

या कालावधीत श्री शिवप्रतिष्ठानचे सर्व शिवपाईक धारकरी आपल्याला अत्यंत प्रिय अशा वस्तूंचा त्याग करतात, तसेच दूरचित्रवाणी संच किंवा भ्रमणभाष पहाणे, लग्न किंवा कुठलाही उत्सव-समारंभ यांना जाणे टाळतात. स्वतःचा वाढदिवसही साजरा करत नाहीत. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांचे बलीदान होऊनही आपला अखंड हिंदु समाज झोपला आहे, याचेच आश्‍चर्य वाटते ! हिंदु समाजाला अजूनही त्याचे काहीच देणे-घेणे नाही. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज संगमेश्‍वर येथील कसबा या ठिकाणी सरदेसाई यांच्या वाड्यात न्यायनिवाडा करत असतांना फंद फितुरीने लांडग्याच्या हाती लागले. धर्मवीर पकडले गेल्यापासून त्या औरंगजेबाने त्यांच्या शरिराचे लचके तोडण्यास प्रारंभ केला. त्यांना साखळदंडात बांधून त्यांची धिंड काढली, त्यांना हालहाल करून मारले. प्राण गेले; पण धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांनी आपला हिंदु धर्म सोडला नाही. अशाच काही औरंग्याच्या औलादी हिंदुस्थानात अजूनही आहेत. त्यांना वेळीच रोखणे, हे आपले परम कर्तव्य असले पाहिजे. त्यासाठी प्रत्येक हिंदूने धर्मवीर बलीदान मास स्वतः पाळून इतरांनाही तो पाळण्यास प्रवृत्त करणे, हे आपले धर्मकर्तव्य असले पाहिजे.’

– श्री. विनीत मोरे, श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, अंबरनाथ.