सर्व रोगांमध्ये उपयुक्त मेथीदाणे

मेथिका वातशमनी श्‍लेष्मघ्नी ज्वरनाशिनी ।

– भावप्रकाशनिघंटु, वर्ग १, श्‍लोक ८५

अर्थ : मेथी वात, कफ आणि ज्वर (ताप) यांचा नाश करते. मेथीला ‘पित्तजित्ज’ म्हणजे ‘पित्तावर विजय मिळवणारी’ असेही म्हटले आहे. याचाच अर्थ मेथी ही वात, पित्त आणि कफ हे तीनही दोष वाढले असतील, तर त्यांना न्यून करते.

दोषा एव हि सर्वेषां रोगाणामेककारणम् ।

– अष्टांगहृदय, सूत्रस्थान, अध्याय १२, श्‍लोक ३२

अर्थ : वात, पित्त आणि कफ हे तीन दोषच सर्व रोगांचे कारण आहेत.

‘कोणताही रोग वात, पित्त किंवा कफ यांची दुष्टी झाल्याविना (म्हणजे वात, पित्त किंवा कफ यांच्यामध्ये विषमता आल्याविना) होऊच शकत नाही’, हा आयुर्वेदाचा सिद्धांत आहे. निरोगी रहाण्यासाठी प्रतिदिन वात, पित्त आणि कफ या त्रिदोषांमध्ये संतुलन राखणे आवश्यक असते. त्रिदोषांमध्ये संतुलन राहिले, तर रोगप्रतिकारक शक्ती वाढते. प्रतिदिन रात्री थोडे मेथीदाणे पाण्यासोबत घेतल्याने तीनही दोषांचे शमन (संतुलन) होते. यामुळे चालू उपचारांना बळ मिळते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते. मेथीदाणे हा आहारातील घटक आहे आणि तो प्रतिदिन आपल्याला लागू पडेल एवढ्याच प्रमाणात घ्यायचा आहे. त्यामुळे मेथीदाण्यांचे सेवन केल्याने कसलेही दुष्परिणाम होत नाहीत.

– वैद्य मेघराज पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (६.४.२०२१)