हरिद्वार येथे चालू असलेल्या कुंभमेळ्यामध्ये हिंदु जनजागृती समितीचे ‘हिंदु राष्ट्र संपर्क अभियान’
हरिद्वार, ८ एप्रिल (वार्ता.) – भारत हे हिंदु राष्ट्रच आहे, त्याला वाचवण्याचे काम करावेच लागेल. हे राष्ट्र निधर्मी केल्याने प्राकृतिक समस्या निर्माण झाल्या आहेत. निधर्मी शब्द घुसडण्यात आला आहे, त्याला आमचा विरोध आहे. हिंदु जनजागृती समितीही याविषयी जनजागृती करत असून तुमचे हे कार्य प्रशंसनीय आहे. देवतांचे विडंबन आणि संतांवर होणारे आघात रोखणे यासंबंधी शासनाने कठोर कायदा त्वरित करायला हवा. हिंदु राष्ट्र आले, तर गोमातेसह सर्वजण सुरक्षित रहातील. हिंदु जनजागृती समितीच्या हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्याने मी प्रसन्न झालो आहे. याच कार्याची सध्या आवश्यकता आहे, असे मार्गदर्शन हरिनगर येथील भागीरथ धामचे स्वामी श्री महाराज यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हरिद्वार येथे चालू असलेल्या कुंभमेळ्यामध्ये ‘हिंदु राष्ट्र संपर्क अभियान’ राबवले जात आहे. या अभियानाच्या अंतर्गत समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी स्वामी श्री महाराज यांची भेट घेतली. त्या वेळी त्यांनी वरील मार्गदर्शन केले.
या वेळी श्री. घनवट यांनी महाराजांना समितीच्या कार्याविषयी माहिती दिली, तसेच कुंभमेळ्यामध्ये धर्म आणि राष्ट्र यांच्या संदर्भातील चित्रमय प्रदर्शन असलेल्या ‘सनातन धर्मशिक्षण आणि हिंदु राष्ट्र-जागृती केंद्रा’ला भेट देण्याविषयी निमंत्रणही त्यांना दिले. या वेळी समितीचे सर्वश्री राजेश उमराणी आणि हरिकृष्ण शर्मा हेही उपस्थित होते.