रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या ‘महाचंडी यागा’च्या वेळी सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण

रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या दोन दिवसांच्या ‘महाचंडी यागा’च्या वेळी सनातनच्या सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण

सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर

१. यज्ञाचा संकल्प होतांना श्री दुर्गादेवी नृत्य करत असतांना दिसणे आणि काही कालावधीने यज्ञस्थळी माश्या तडफडत मरत असल्याचे आढळणे

‘२५.६.२०१९ या दिवशी संत यज्ञाचा संकल्प करत असतांना मला श्री दुर्गादेवी मारक रूपात नृत्य करतांना दिसली. श्री दुर्गादेवीने तिच्या हातामध्ये त्रिशूळ धारण केलेला असून त्याचे टोक भूमीवर आपटून सूक्ष्म नाद निर्माण करून ती वाईट शक्तींना दूर करत होती. तिचे रूप बघून ‘ईश्‍वरी राज्य (हिंदु राष्ट्र) स्थापनेत बाधा आणणार्‍या सर्व वाईट शक्तींना ती दूर करण्यासाठीच आज अवतरली आहे’, असे मला जाणवले. काही वेळानंतर सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ देवीची पूजा करत असतांना यज्ञस्थळी माशा तडफडत मरत असल्याचे आढळले. यांतून ‘देवी स्थुलातून वाईट शक्तींना दूर करण्याची प्रक्रिया दाखवत आहे’, असे जाणवले. (श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे महर्षींनी नामकरण करण्यापूर्वीचा लेख असल्याने त्यांचा उल्लेख पूर्वीप्रमाणेच सद्गुरु असा ठेवला आहे. – संकलक)

२. सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ गणपतीची पूजा करतांना भारताचा नकाशा पिवळ्या रंगाचा दिसून यज्ञातील चैतन्य वणवा पेटल्याप्रमाणे पूर्ण भारतात पसरत असल्याचे दिसणे आणि सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी आचमन करून ताम्रपात्रात सोडलेल्या पाण्यालाही भारताच्या नकाशाचे रूप येणे

यागाच्या वेळी सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ गणपतीची पूजा करत असतांना माझ्या डोळ्यांच्या समोर भारताचा नकाशा आला. हा नकाशा मला पिवळ्या रंगाचा दिसत होता. सद्गुरुद्वयी करत असलेल्या पूजेचा अग्नि मूळस्रोत होता आणि त्यातून पूर्ण भारतात वणवा पेटत होता. या दृश्याला बघून माझ्या लक्षात आले, ‘यज्ञातील चैतन्य पूर्ण भारतभरात प्रक्षेपित होत आहे.’ असे दृश्य दिसण्याच्या काही क्षणानंतर सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी आचमन करून ताम्रपात्रात सोडलेल्या पाण्याला भारताच्या नकाशाचे रूप येण्याची दैवी प्रचीती मिळाल्याचे साधकांना आढळले. यांतून सूक्ष्म स्तरावर देव दाखवत असलेल्या प्रक्रियेची त्याने स्थुलातून पोचपावती दिली असल्याचे लक्षात आले.

३. कुंकुमार्चन करतांना देवीच्या चरणांच्या ठिकाणी साठलेल्या कुंकवावर ॐ चा आकार उमटत असल्याचे दिसणे

सद्गुरुद्वयी कुंकुमार्चन करत असतांना देवीच्या चरणांच्या ठिकाणी कुंकू साठले होते. काही वेळाने सद्गुरुद्वयी देवीला कुंकुमार्चन करत असलेले कुंकू देवीच्या चरणांच्या ठिकाणी साठलेल्या कुंकूवर पडल्यावर त्याच्यावर ॐ चा आकार उमटत असल्याचे दिसत होते. यात वैशिष्ट्यपूर्ण असे की, प्रत्येक वेळी सद्गुरुद्वयी देवीला कुंकुमार्चन करतांना तसे अनुभवायला येत होते. (प्रत्यक्षातही नंतर ॐ दिसत होता; परंतु त्याचा आकार सातत्याने पालटत होता.)

४. महाचंडी याग चालू झाल्यावर श्री दुर्गादेवीने विराट रूप धारण करून साधकांना आशीर्वाद देणे आणि वाईट शक्तींशी सूक्ष्म युद्ध करणे

महाचंडी यागाला प्रारंभ झाल्यावर यज्ञस्थळी ठेवण्यात आलेली योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी आशीर्वादस्वरूप दिलेली श्री दुर्गादेवीची अष्टभुजा मूर्ती सूक्ष्मातून यज्ञकुंडाच्या मध्यभागी स्थिर झालेली मला दिसली. या वेळी देवीचे रूप पूर्ण जिवंत झाले होते. तिने धारण केलेली लाल साडी आणि तिचे वाहन सिंह हे सर्व सजीव झाले होते. त्यांची हालचाल होत होती. या वेळी देवी साधकांना आशीर्वाद देत होती. हळूहळू देवीचे रूप पुष्कळ विशाल होत जाऊन ते आकाशाएवढे पसरले. तेव्हा ‘ती विराट रूप धारण करून पूर्ण ब्रह्मांडात फिरून सर्व वाईट शक्तींशी सूक्ष्म युद्ध करत आहे’, असे मला जाणवले.

५. महाचंडी याग होतांना सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ सूक्ष्मातून गरुडावर आसनस्थ होऊन अस्तित्वातून सूक्ष्म युद्ध करून पाताळातील वाईट शक्तींना दूर असल्याचे दिसणे

महाचंडी यागाच्या वेळी सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ दुर्गा सप्तशतीचे पठण करत हवन करत असतांना सूक्ष्मातून श्री दुर्गादेवी घनघोर सूक्ष्म युद्ध करत असल्याचे अनुभवायला येत होते. मी डोळे बंद केल्यावर ‘श्री दुर्गादेवीच्या पाठोपाठ मला दोन्ही सद्गुरुद्वयीही अवकाशात गरुडावर सूक्ष्म युद्धासाठी सिद्ध असलेल्या दिसल्या. त्यानंतर पाताळातील वाईट शक्ती विविध पक्ष्यांच्या आक्राळ-विक्राळ रूपात सूक्ष्म युद्ध करण्यासाठी आलेल्या दिसल्या आणि ब्रह्मांडात त्यांचे सूक्ष्म युद्ध होत होते. या वेळी सद्गुरुद्वयी यांनी हातात शस्त्र धारण केले होते; पण त्यांच्या अस्तित्वानेच सर्व वाईट शक्ती दूर होत असल्याचे जाणवणे.

६. महाचंडी याग होतांना श्री दुर्गादेवीच्या लहान मूर्तीतून तारक शक्ती, तर योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी दिलेल्या मोठ्या मूर्तीच्या आज्ञाचक्रातून सुदर्शनचक्र प्रक्षेपित होऊन यज्ञ परिसराचे संरक्षण होणे

यज्ञाच्या पूजेच्या रचनेत श्रीदुर्गादेवीच्या २ मूर्ती ठेवण्यात आल्या होत्या. लहान मूर्तीवर षोडशोपचार पूजन आणि कुंकुमार्चन करण्यात आले. योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी दिलेली मोठी मूर्ती पूजास्थानी होती. सद्गुरुद्वयी ब्रह्मांडात सूक्ष्मातून युद्ध करत असतांना योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी दिलेल्या श्री दुर्गादेवीच्या मूर्तीच्या आज्ञाचक्रातून सुदर्शनचक्र प्रक्षेपित होऊन यज्ञ परिसराचे रक्षण करत होते. यामुळे वाईट शक्तींना यज्ञ परिसरावर आक्रमणे करून यज्ञात विघ्ने आणता येत नव्हती. या वेळी पूजा झालेल्या श्री दुर्गादेवीच्या लहान मूर्तीतून पांढर्‍या प्रकाशाच्या स्वरूपात सर्वत्रच्या साधकांसाठी तारक शक्ती प्रक्षेपित होत होती.

७. महाचंडी यागात संतांच्या आगमनापूर्वी आणि आगमन झाल्यावर जाणवलेले भेद

७ अ. संतांच्या आगमनापूर्वीची स्थिती : महाचंडी यागात संतांचे आगमन होण्यापूर्वी पुष्कळ अस्वस्थता आणि दाब जाणवत होता. यज्ञातून प्रक्षेपित होणारा धूर डोळ्यांना बोचत असल्याने त्याचा त्रास होत होता. सूक्ष्मातून बघितल्यावर अनेक वाईट शक्ती आक्राळ-विक्राळ रूप घेऊन यज्ञस्थळी फिरत होत्या आणि सातत्याने यज्ञात अडथळे आणण्यासाठी प्रयत्न करत होत्या. यामुळे भीतीदायक वातावरण निर्माण झाले होते. या वेळी वाईट शक्तींनी सोडलेल्या त्रासदायक शक्तीने ढगांच्या स्वरूपात यज्ञस्थळाला चारही बाजूने वेढा घातला होता.

७ आ. संतांच्या आगमनानंतर जाणवलेला पालट

७ आ १. वाईट शक्ती आकाशात दूर फेकल्या जाणे : संतांचे आगमन होण्यापूर्वी अनेक वाईट शक्ती घाबरून किंचाळत पळत होत्या आणि इतर वाईट शक्तींना सावध करत होत्या. त्यांच्या आगमनाची वाईट शक्तींमध्ये एवढी धास्ती निर्माण झाली होती की, त्यामुळे त्यांच्यात हलकल्लोळ अन् भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. संत यज्ञस्थळी येत असतांनाच त्रासदायक शक्तीचे ढग बाजूला झाले होते, तर त्यांचे आगमन झाल्यावर त्यांच्या अस्तित्वातून प्रक्षेपित होणार्‍या चैतन्यामुळे सर्व वाईट शक्ती आकाशात दूर फेकल्या जात होत्या. या दूर फेकल्या गेलेल्या वाईट शक्ती कृष्ण विवराकडून खेचल्या जात होत्या.

७ आ २. यज्ञकुंड आणि सद्गुरुद्वयी यांच्याभोवती पांढर्‍या रंगाचे संरक्षककवच निर्माण होणे : संतांच्या अस्तित्वातून प्रक्षेपित होणार्‍या चैतन्यामुळे सद्गुरुद्वयी (सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ), पुरोहित साधक आणि यज्ञकुंड यांच्याभोवती पांढर्‍या रंगाचे संरक्षककवच शंकूच्या आकारात निर्माण झाले होते. हा शंकू पूर्ण अखंड असून थेट ईश्‍वरी स्रोताशी जोडलेला होता. यामुळे वाईट शक्तींना आक्रमण करून त्याला तडा देणे शक्य होत नव्हते आणि चैतन्यही सहजतेने यज्ञस्थळी येत होते.

७ आ ३. वायूमंडलावर झालेला परिणाम – धुराचा त्रास आणि अस्वस्थता न्यून होणे : संतांचे यज्ञस्थळी आगमन झाल्यावर पूर्वी होत असलेल्या धुराचा त्रास आणि अस्वस्थता न्यून होऊन शीतलता जाणवू लागली, तसेच त्यांच्याकडून पांढर्‍या रंगाचा प्रकाश, म्हणजे निर्गुण तत्त्वच यज्ञस्थळी पसरत असल्याचे दिसले.

७ आ ४. सूक्ष्म विश्‍वावर झालेला परिणाम : संत यज्ञस्थळी असतांना त्यांचे मनुष्यातून देवतेच्या रूपात रूपांतर झाले. अन्य देवता या देवतेवर पुष्पवृष्टी करत होत्या आणि त्या वेळी या देवतेने पुष्कळ विराट रूप धारण केले होते. त्या वेळी ‘प्रत्येक गोष्ट, प्रत्येक जीव आणि पूर्ण सृष्टी म्हणजे देव अन् देवतत्त्वच आहेे. या वेळी सर्वत्र निळसर प्रकाश पूर्ण सृष्टीत प्रक्षेपित होत होता. प्रत्येक जड वस्तू, फूल, पत्री, पशू, पक्षी, सृष्टी, मानव इत्यादी सर्व निळसर दिसून देवतेची भक्ती करत त्याची स्तुती करत आहेत आणि त्याच्याशी एकरूप होत आहेत’, असे दिसत होते.

या वेळी सूक्ष्मातून शंखनाद आणि देवतांचा जयजयकार ऐकू येत होता.’

– सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२७.६.२०१९)

  • सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात.
  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.