मुंबईतील ‘मॉर्निंग स्टार स्कूल’कडून घेण्यात येणारी तिसरीची परीक्षा शिक्षण विभागाने थांबवली !

  • हिंदु जनजागृती समितीच्या तक्रारीचा परिणाम !

  • ‘मॉर्निंग स्टार स्कूल’सारख्या ख्रिस्ती मिशनरी शाळांची नोंदणी त्वरित रहित करा ! – हिंदु जनजागृती समितीची मागणी

मुंबई – राज्यात कोरोनाचा उद्रेक वाढत असतांना सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्याचा आदेश राज्यशासनाने दिला आहे. ‘इयत्ता १ ली ते ८ वी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांच्या परीक्षा रहित करण्यात येत असून या इयत्तेतील सर्व विद्यार्थ्यांना उत्तीर्ण केले जाईल’, असे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी घोषित केले आहे. परिस्थितीचे गांभीर्य पहाता मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांनी राज्यात अंशत: दळणवळण बंदी घोषित करत सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहनही केले आहे. असे असूनही मुंबईतील धारावी येथील ‘मॉर्निंग स्टार स्कूल’ या ख्रिस्ती मिशनरी शाळेत इयत्ता ३ रीच्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शाळेत बोलावून द्वितीय सत्राची लेखी परीक्षा घेण्यात येत होती. याविषयी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ६ एप्रिल या दिवशी बृहनमुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाला तक्रारीचे निवेदन देण्यात आले. निवेदनानंतर शिक्षणाधिकारी महेश पालकर यांनी ‘मॉर्निंग स्टार स्कूल’ला त्वरित नोटीस पाठवून ही परीक्षा थांबवली.

हिंदु जनजागृती समितीने दिलेले तक्रार पत्र (मोठे करून पहाण्यासाठी चित्रावर क्लिक करा !)

विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळणार्‍या या गंभीर प्रकाराच्या विरोधात हिंदु जनजागृती समितीने शिक्षणमंत्री, शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाचे अप्पर मुख्य सचिव, शिक्षण उपसंचालक मुंबई यांच्याकडेही तक्रार केली होती. याविषयीचे निवेदन देतांना  आंतरराष्ट्रीय बजरंग दलाचे श्री. विशाल पटनी, श्री शिवकार्य प्रतिष्ठान (विक्रोळी) चे संस्थापक अध्यक्ष श्री. प्रभाकर भोसले, वज्रदल संघटनेचे श्री. संजय चिंदरकर आणि हिंदु जनजागृती समितीचे समन्वयक श्री. सागर चोपदार उपस्थित होते.

शिक्षणमंत्री ज्या मतदारसंघातून निवडून येतात, त्याच मतदारसंघात ही मिशनरी शाळा आहे. ‘मॉर्निंग स्टार स्कूल’कडून कोरोनाच्या भीषण संकटकाळातही परीक्षा घेण्यात येत होती. याविषयी काही पालकांनी हिंदु जनजागृती समितीला कळवले. समितीने त्वरित याविषयी शिक्षण उपसंचालकांना निवेदन देऊन कारवाईची मागणी केली. यानंतर शिक्षण उपसंचालकांनीही तत्परतेने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाला कळवले आणि परीक्षा तात्काळ थांबवली.

शिक्षण विभागाने नोटीस देत ‘मॉर्निंग स्टार स्कूल’ला दिलेली नोटीस (मोठे करून पहाण्यासाठी चित्रावर क्लिक करा !)

कायदा मोडणार्‍या ‘मॉर्निंग स्टार स्कूल’वर आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या अंतर्गत कठोर कारवाई करावी ! – अरविंद पानसरे, प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

मुंबईतील कोरोनाचा वाढता संसर्ग पहाता राज्य शासनाने निर्बंध घातलेले असतांनाही ‘मिशनरी स्कूल’ चालूच आहेत, हे अत्यंत गंभीर आहे. याचा अर्थ ‘मिशनरी स्कूल’ राज्य शासनाचे आदेश मानत नाहीत, असाच होतो. एरव्ही शासन आणि पोलीस प्रशासन मास्क न वापरल्यास सामान्य नागरिकांना १ सहस्र रुपये इतका दंड आकारते आणि आवश्यक तेथे कायद्याचा ‘दंडुका’ही देते; पण इथे मात्र लहान मुलांच्या जिवाशी खेळून कायद्याचा भंग करूनही केवळ नोटीस पाठवण्याची कृती होते. ख्रिस्ती मिशनरी शाळा आहे; म्हणून जर कारवाई होणार नसेल, तर हे अत्यंत अयोग्य आहे. यामुळे जनतेमध्ये चुकीचा संदेश जात आहे. कायदा मोडणार्‍या ‘मॉर्निंग स्टार स्कूल’वर ‘आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५’ अंतर्गत कठोर कारवाई करावी. शाळेची नोंदणी रहित करावी. शाळेचे संचालक, मुख्याध्यापक आणि संबंधित उत्तरदायी यांच्यावरही कठोर कारवाई करावी.