उत्तम स्वास्थ्यासाठी !

कोरोनासह जगायचे म्हणजे शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. याचसमवेत प्राणघातकी वायूप्रदूषण अल्प करण्यात सिंहाचा वाटा उचलण्यासाठी, तसेच व्यायाम म्हणून ‘सायकल’चा पर्याय निवडणे रास्त आहे. काही लोकांना महानगरांत नोकरी – व्यवसाय यांच्या निमित्ताने रहाणे अनिवार्य असल्याने, त्यांनी सायकलचा उपयोग करण्याची सवय केल्यास कालांतराने ती अंगवळणी पडेल; पण आरंभीपासूनच नकारघंटा वाजवली, तर कार्यालय घरापासून दुचाकीने १५-२० मिनिटांच्या अंतरावर असले, तरी सायकलचा विचारही मनाला स्पर्शणार नाही. किंबहुना ज्यांचे कार्यालय निवासस्थानापासून जवळ आहे, त्यांनी सायकलच्या पर्यायाचा गांभीर्याने विचार करावा. सप्ताहातून किमान एकदा तरी जवळच्या अंतरासाठी सायकलचा उपयोग करून पहाता येईल.

आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाचे दर चढे असल्याने भारतातही ते वाढले आहेत, असे सांगितले जाते. असे असले तरी येथे चारचाकीसह दुचाकीचाही उपयोग करणारा मोठा वर्ग आहे. महाराष्ट्रातील पुणे शहर, तर त्यासाठी प्रसिद्ध आहे. यावरून किती प्रमाणात इंधन एकट्या त्या शहरात जळत असेल ? याचा विचार करू शकतो. एरव्ही चालत ५ ते १० मिनिटांवर असलेल्या ठिकाणी वैयक्तिक कामांसाठीही सर्रासपणे दुचाकीचा उपयोग होतो. चालणे हा एक महत्त्वाचा व्यायाम प्रकार आहे; पण तो करणार कोण ? आणि कशासाठी ? ज्यांच्याकडे दुचाकी नाही, अशी मंडळी घरापासून काही अंतरावर असलेले बस, रेल्वेस्थानक गाठण्यासाठी रिक्शा अथवा अन्य पर्यायांना पसंती देतात. रात्री साधारणपणे ६ घंटे विश्रांती घेतल्यावर १०-१५ मिनिटे तरी चालण्यास अडचण नसावी. घरगुती कामे आटोपूनच कामावर निघावे लागत असेल, तर ती लवकर पूर्ण कशी करता येतील ? आणि चालणे कसे होईल ? याकडे लक्ष दिल्यास ते स्वतःच्याच शारीरिक लाभाचे असेल. उत्तम स्वास्थ्यासाठी शरिराला थोडी शारीरिक कष्ट करण्याची सवय लावल्यास छोट्या शारीरिक कुरबुरींवर सहजपणे मात करता येईल, तसेच दिवसभर उत्साही वाटेल. त्यामुळे उत्साही रहाण्याची सुवर्णसंधी दवडायला नको !

– श्री. जयेश राणे, भांडुप, मुंबई.